
मुंबई : श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अमंलबजावणी तातडीने सुरु करून, कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे, दर्जेदार विकास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २७ जून रोजी दिले. यावेळी श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७-गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा) २८८.१७ कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.
सह्याद्री अतिथिगृहावर श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यासंदर्भातील आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना सूचित केले. बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या संख्यने भाविक आणि पर्यटक येतात, त्यांना केंद्रबिंदू ठेऊन याठिकाणी विविध दर्जेदार सुविधा विकसित कराव्यात. कुंभमेळा सुरु होण्यापूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासाचे काम पूर्ण करावयाचे आहे, त्यादृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, टाईमलाईन ठरवून काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंद्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन व्यापक प्रमाणात येथे इको टुरिझम संकल्पना विकसित करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करुन वनभ्रमण पथ तयार करावे. त्याचसोबत पर्यटक,भाविकांसाठी रोप वे ची सुविधा विकसित करावी. निगडाळे या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीच्या ठरणा-या सर्व सुविधा हॉटेल, रेस्टॉरंट त्याचसोबत इच्छुकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा , वाहतूक मार्ग,अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य द्यावे. तसेच याठिकाणी हेलीपॅड सुविधा उपलब्ध करुन देण्याचे ही नियोजन करावे. या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकान दयावीत. तसेच राजगुरुनगर-तळेघ- भीमाशंकर महामार्ग हा सुरळित वाहतूक व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे , त्यादृष्टीने त्याचा विकास करण्यात यावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भावीकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी,त्यासाठी अतिरिक्त पोलिस चौकी या परिसरात उभारावी. तसेच विनाखंड वीज पुरवठा सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने वीज उपकेंद्र ही याठिकाणी दयावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.