आता नवीन बाईकसोबत मिळणार दोन हेल्मेट! सोबत 'एबीएस'ही अनिवार्य; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा प्रस्ताव
28 Jun 2025 16:58:45
मुंबई : (Safety Rules for Two Wheelers) रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी तसेच दुचाकी वाहनचालकांच्या सुरक्षितेसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जानेवारी २०२६ पासून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) अनिवार्य करण्याची तसेच, नवीन बाईक खरेदीवर दोन BIS प्रमाणित हेल्मेट्स देणे अनिवार्य असणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे.
माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम, १९८९ मध्ये संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मसुदा २३ जून रोजी सादर करण्यात आला आहे. दुचाकी चालक आणि मागे बसलेल्या प्रवाशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आहे. "केंद्रीय मोटर वाहन (संशोधन) नियम, २०२५ लागू झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत, दुचाकी वाहन उत्पादकाने वाहन खरेदीवेळी भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या मानकांनुसार दोन संरक्षक हेल्मेट पुरवणे बंधनकारक असेल." असे या मसुद्यात म्हटले आहे.
यानुसार, ग्राहकांना देण्यात येणाऱ्या हेल्मेट्सनी भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या गुणवत्ता मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय १ जानेवारी २०२६ पासून सर्व नवीन L2 श्रेणीच्या दुचाकी वाहनांना अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या ABS सिस्टमने भारतीय मानकाचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळे अचानक ब्रेक लावताना वाहनावरील नियंत्रण सुधारून घसरण्याचा धोका कमी होणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासांनुसार, ABS मुळे रस्ते अपघातांची संख्या ३५ ते ४५ टक्क्यांनी कमी होऊ शकते.