कुख्यात दहशतवादी साकिब नाचनचा मृत्यू!

28 Jun 2025 19:31:18

नवी दिल्ली : (Saqib Nachan) महाराष्ट्र आयएसआयएस दहशतवादी मॉड्युल प्रकरणातील मुख्य आरोपी साकिब नाचनचा शनिवारी दि. २८ जूनला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नाचनचे वकील समशेर अन्सारी यांनी नाचनच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ९ डिसेंबर २०२३ रोजी अटक केल्यानंतर नाचनला तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. कारागृहात त्याची प्रकृती बिघडल्यामुळे कारागृह अधिकाऱ्यांनी सोमवारी त्याला दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल केले. नाचनला आलेल्या ब्रेन स्ट्रोकबाबतची माहिती त्याच्या कुटुबियांना देण्यात आली होती. बुधवारी सकाळी प्रकृती बिघडल्यानंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते, अशी माहिती त्याचे वकील समशेर अन्सारी यांनी दिली. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान शनिवारी त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने दुपारी १२:१० वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

साकिब नाचन हा सिमी अर्थात ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ आणि 'इंडियन मुजाहिदीन' यांसारख्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता त्याने मुंबईत अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. मुंबई सेंट्रल, विलेपार्ले आणि मुलुंड येथे २००२ आणि २००३ मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये सुमारे १२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्याला 'दहशतवाद प्रतिबंधक कायदा, २००२'अंतर्गत (POTA- Prevention of Terrorism Act, 2002) शस्त्रे बाळगल्याबद्दल दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

२०१७ मध्ये तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर तो आपल्या गावी पडघा येथे परतला. त्याने पडघाला त्याच्या दहशतवादी योजनांचा आधार बनवले. मात्र, पोलीस आणि तपास यंत्रणा त्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होती. एनआयएने २०२३ मध्ये दिल्लीतून आणि पडघा परिसरातून १५ संशयितांसह नाचनला अटक केली होती. तिहार तुरुंगातून नाचनला ताब्यात घेण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात प्रॉडक्शन वॉरंट दाखल करण्याच्या तयारीत एटीएस होती. पण त्यापूर्वीच त्याचे निधन झाले.






Powered By Sangraha 9.0