मुंबई : मेट्रो लाईन ९ दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर आणि मेट्रो लाईन ७ अ (गुंदवली ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ) या प्रकल्पांना आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठित आयएएन प्लॅटिनम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या 'इन्फ्राकॉन इंडिया नॅशनल अवॉर्ड्स २०२५'या कार्यक्रमात राष्ट्रीय दर्जाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही गौरवशाली उपलब्धी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भाप्रसे) यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली मिळाली आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. ही मान्यता एमएमआरडीएच्या बांधकाम क्षेत्रातील पर्यावरणपूरक दृष्टीकोन, सुरक्षित कामकाजाचे वातावरण आणि सहभागी प्रत्येक घटकाच्या कामगारांपासून ते भावी प्रवाशांपर्यंत कल्याणासाठी असलेल्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा पुरस्कार केवळ एक गौरव नसून, मुंबईसाठी एक सक्षम, टिकाऊ आणि जागतिक दर्जाचे मेट्रो नेटवर्क उभारण्याच्या एमएमआरडीएच्या व्यापक ध्येयाचा गौरव आहे, असे एमएमआरडीएने सांगितले. तसेच, या राष्ट्रीय सन्मानाबद्दल आम्ही IIN आणि इन्फ्राकॉन अवॉर्ड्स समितीचे मन:पूर्वक आभार मानतो आणि भविष्यातही जलद, सुरक्षित, हरित आणि सर्वसमावेशक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही एमएमआरडीएने एक्स या समाजमाध्यमांवर म्हंटले आहे.
पुरस्कार पुढील निकषांवर आधारित
१. कामगार व प्रवासी यांच्या सुरक्षिततेसाठी राबवलेली प्रभावी आरोग्य व सुरक्षा उपाययोजना
२. बांधकाम प्रक्रियेतील पर्यावरणीय नियमांचे व सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन
३. शहरी पायाभूत प्रकल्पांमध्ये नव्याने राबवलेली अभिनव सुरक्षा उपाययोजना