डोंबिवली : कल्याण परिमंडळ-३ च्या पोलिसांनी हायप्रोफाईल अशा लोढा पलावा सोसायटीत छापा टाकला असता त्याठिकाणी दोन कोटी १२ लाखांचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका तरुणीचा समावेश आहे. काॅल सेंटरमध्ये काम करत असल्याचा दिखावा करणारे हे तिघे शहरात तरुणाईला ड्रग्ज पुरवित होते. पोलिस आत्ता या रॅकेटच्या सूत्रधारांच्या शोधात आहेत.
कल्याण डोबिवलीत नशेखोरांच्या विरोधात कल्याण पोलिस परिमंडळ तीन चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मोठी मोहिम हाती घेतली. ड्ग्ज विरोधातील कारवाईसाठी पोलिस् स्टेशनसह पथकाची नेमणूक केली आहे. गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांना अटक केली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीपान शिंदे यांच्या नेतृत्वात मानपाडा पोलिसांनी लोढा पलावा परिसरातील डाऊन टाऊन या हाय प्रोफाईल सेासायटीत छापा टाकला. एका घरात जवळपास दोन किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणात तीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पकडलेले आरोपी यात एका तरुणीचा समावेश आहे. हे काॅल सेंटर आणि खाजगी कंपनीत काम करतात असे भासवित होते. मात्र भाड्याने घरे घेऊन हे लोक ड्रग्ज विकण्याचे काम करत होते. या रॅकेटचा मुख्य सूत्रधारासह आणखीन काही आरोपीच्या मागावर पोलिस आहेत. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल अशी माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे. या सोबतच कल्याण डोंबिवलीत नशेचे अंमली पदार्थ विकणाऱ्या १०५ टपऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. खडकपाडा आणि महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३० किलो गांजा जप्त करुन तीन आरोपीना अटक केली आहे. त्यापैकी दोन आरोपी जालन्यातील आहे. पोलिस उपायुक्तांकडून सुरू असलेल्या कारवाई मोहिमेचे नागरीकांकडून कौतुक केले जात आहे.