वॉशिंग्टन : टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी 'घटत्या जन्मदराबद्दल' गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असा दावा केला की, घटत्या जन्मदरामुळे लोकसंख्या कोसळू शकते. जगातील प्रजनन दर हा शाश्वत पातळीपेक्षा झपाट्याने घसरत असून पालकांनी दोन पेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचे आवाहन मस्क यांनी केले आहे.
ट्विटरवरील एका पोस्टद्वारे त्यांनी एका फॉर्च्यून अहवालाचा दाखला दिलाय. लोकसंख्या पातळी राखण्यासाठी महिलांनी सरासरी दोन पेक्षा अधिक मुलांना जन्म देणे गरजेचे असल्याचे त्यात म्हटले आहे. फॉर्च्यून अहवालाच्या मते, "प्रति महिलेला २ मुले असणे हा दर आता जुना मानला गेला आहे. दीर्घकालीन घटता जन्मदर टाळण्यासाठी आवश्यक असलेली नवीन जन्मदर संख्या २.७ म्हजणे ३ किंवा त्यापेक्षा अधिक मुले असणे गरजेचे आहे. नवीन जन्मदर संख्यानुसार सध्या अमेरिका १.६६, इटली १.२९ आणि जपान १.३० वर आहे.
याच अहवालातील “द रिअल फर्टिलिटी क्रायसिस” शीर्षक असलेल्या माहितीत, भारताचा एकूण प्रजनन दर प्रति महिला १.९ जन्मदरांपर्यंत घसरला आहे, जो नवीन जन्मदर असलेल्या २.७ च्या मर्यादेपेक्षा अतिशय कमी आहे असे अधोरेखित केले आहे. स्वतः एलन मस्क यांच्याबाबत सांगायचे झाल्यास, त्यांची पत्नी विल्सन यांनी पाच मुलांना जन्म दिला आहे. ज्यामध्ये जुळे असलेले विवियन आणि ग्रिफिन, काई, सॅक्सन आणि डॅमियन अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.