अखेर नाशिकमधील 'तो' नेतासुद्धा ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार! १५ दिवसांत दोन धक्के

27 Jun 2025 15:49:54


नाशिक : उबाठा गटाचे नाशिकमधील महानगर प्रमुख विलास शिंदे हे नाराज असून ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप केला असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

काही दिवसांपूर्वीच उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खरंतर, त्याचवेळी विलास शिंदेदेखील नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आता त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली असून लवकरच ते पक्षाला रामराम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काही माजी नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांसह ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

माथाडी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत काकडे यांचा भाजपमध्ये प्रवेश!

एका वृत्तवाहिनीशी बोलताना विलास शिंदे म्हणाले की, "स्थानिक नेत्यांकडून मला कायम डावलण्यात आले. प्रत्येकवेळी मी जे जे मागितले त्यासाठी मला नकारच देण्यात आला. गेली अनेक वर्षे मी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले. तरीसुद्धा अनेकदा मला विविध पदांपासून दूर ठेवण्यात आले. यात पक्षप्रमुख किंवा संजय राऊत साहेबांचा दोष नाही. परंतू, स्थानिक नेत्यांकडून मला डावलण्यात आले," असे ते म्हणाले.

मुलीच्या लग्नाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती!

अलीकडेच विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी ‘शिंदे आहेत, शेवटी शिंदेंकडेच जाणार’ असं विधानही केलं होतं. त्यामुळे विलास शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा उफाळून आल्या होत्या. तसेच सुधाकर बडगुजर यांनी आपली नाराजी व्यक्त करताना नाशिकमध्ये विलास शिंदे यांच्यासह आणखी १० ते १२ जण नाराज असल्याचा दावा केला होता. 





Powered By Sangraha 9.0