स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' नव्या स्वरुपात!

27 Jun 2025 12:39:01

sangeet sannyastha khadga written by swatantryaveer savarkar in a new form


मुंबई : सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव व या नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्व. सुधीर फडके यांनी स्थापन केलेली सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था स्वा. सावरकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत असून याचाच एक भाग म्हणून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणत आहोत. सावरकरांचे विचार, साहित्य आजच्या पिढी पुढे आणणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. हे नाटक कालसुसंगत आहे म्हणूनच याचे महाराष्ट्रभर १०० प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याकरिता तिकीटदर ३०० /२००/१०० सर्वसामान्यांना परवडतील असे ठेवण्यात आल्याचे रवींद्र माधव साठे यांनी सांगितले. हे नाटक नव्या पिढीतील तरूण सादर करत आहेत असेही साठे यांनी सांगितले. नाट्यसंपदा कला मंचाचे अनंत पणशीकर हे नाटकाचे सहनिर्माते असून मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार व दिग्दर्शक ऋषीकेश जोशी यांनी नाटकाची रंगावृत्ती आणि दिग्दर्शन केले आहे. संगीत कौशल इनामदार यांचे आहे.

या नाटकाचे सहनिर्माते अनंत पणशीकर यावेळी म्हणाले,‘सावरकरांचे भाषासौंदर्य आणि त्यांच्या लेखांतून दर्शवणारी भव्य दृकश्राव्यता मला कायम भुरळ घालते. हे नाटक त्याचं उत्तम उदाहरण आहे. व्यावसायिक गणित मांडताना आम्हाला सावरकर प्रतिष्ठानची खूप मदत झाली. 'अहिंसेचे तत्वज्ञान' आणि 'राष्ट्रहित' यातील द्वंद्व म्हणजे 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक. अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितलेले या नाटकातले विचार आजही अगदी तंतोतंत खरे ठरतात. ते विचार, आदर्श या नाटकातून नवीन पिढीपर्यंत पोहचवण्याचा आमचा निर्धार असल्याचे दिग्दर्शक ऋषीकेश जोशी यांनी यावेळी सांगितले.

मयुरा रानडे, ओंकार कुलकर्णी, केतकी चैतन्य, ओमप्रकाश शिंदे आणि ऋषिकेश जोशी आदि कलाकारांचा या नाटकात समावेश आहे. भव्य आणि आकर्षक सेट्स, देखणी वेशभूषा, कलाकारांचा अभिनय आणि सावरकरांचे तेजस्वी विचार ही 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाची वैशिष्ट्ये आहेत. १९३१ साली मा. दीनानाथ मंगेशकर यांनी हे नाटक रंगमंचावर आणले होते. यातील 'शतजन्म शोधताना’, ‘मर्मबंधातली ठेव ही’ , ‘सुकतात ही जगी या’.. अशी गाणी स्वतः दीनानाथांनी आपल्या गायकीने आणि संगीताने अजरामर केली आहेत.

८ जुलै १९१० रोजी स्वा. सावरकरांनी मार्सेलिस येथे ब्रिटिश जहाजातून जगप्रसिध्द उडी मारली होती. या दिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानने ८ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग योजला आहे. हे नाटक नव्या स्वरूपात व्यावसायिक रंगमंचावर येत असून देशात जिथे जिथे मराठी समाज आहे तेथे हे नाटक पोहोचेल. याचे १०० प्रयोग करण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प आहे, असे प्रतिपादन रवींद्र साठे यांनी केले. नेपथ्य - संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना- अमोघ फडके, नृत्ये - सोनिया परचुरे, वेशभूषा- मयूरा रानडे, रंगभूषा- श्रीकांत देसाई यांची आहे. सूत्रधार दिपक गोडबोले आहेत. या नाटकास अधिकाधिक लोकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0