
मुंबई: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हिताच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत युती करत मराठी माणसाशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे सचिव प्रतिक कर्पे यांनी केला. “मराठीचे अस्तित्व पुसण्याचे काम उबाठा परिवाराने केले आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वसामान्य मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवेल,” असे कर्पे यांनी ट्वीटमध्ये ठणकावले आहे.
कर्पे यांनी आपल्या ट्वीटमध्ये ठाकरे गटावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. पत्रा चाळीतील मराठी माणसांना बेघर करण्याचे काम ठाकरे गटाने केले. तसेच, मुंबई महानगरपालिकेत सत्ता असताना १५० मराठी शिक्षकांना मराठीतून शिक्षण घेतल्यामुळे नोकऱ्या नाकारण्यात आल्या, असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय, मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या आणि पटसंख्या २०१०-११ मध्ये ४१३ शाळा आणि १,०२,२१४ विद्यार्थी असताना २०२०-२१ मध्ये २८० शाळा आणि ३३,११४ विद्यार्थ्यांपर्यंत खालावली, यास ठाकरे गट जबाबदार असल्याचा आरोप कर्पे यांनी केला आहे. या ट्वीटमुळे सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.