ओडिशा : भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते.
हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच एवढी असते. या १६ चाकांच्या रथावर त्रिलोक्यामोहिनी हा ध्यज फडकत असतो. तळध्वज– बलभद्रासाठी, या ध्यजाला हळध्यज नावानेही ओळखले जाते. हा रथ ७६३ लाकडांचा वापर करून बनवलेला असून २५० ते २७० टन वजनाचा असतो. उंची ४५ फूट तर लांबी ३३ फूट एवढी असते,१४ चाकांच्या तळध्यज रथावर उनानी हा ध्यज असतो.

आता राहीला दर्पदलन – सुभद्रासाठी, या रथाला प्द्मध्वजही म्हटले जाते, ५९३ लाकडांचा हा रथ २४० ते २६० टन वजनाचा असतो. ४४ फूट उंच आणि ३१ फूट सहा इंच लांब त्याचबरोबर १२ चाकांच्या या रथावर नंदबिका ध्यज लावला जातो. प्रत्येक रथाच्या झेंड्यांचा रंगही वेगळा असतो.
हे रथ पूर्णपणे हाताने बनवले जातात, ज्यात पाच प्रकारच्या विशेष लाकडाचा वापर केला जातो. लाकडाचे मोजमाप करण्यासाठी कोणत्याही तराजूचा वापर केला जात नाही, तर ४५ फूट उंच आणि २०० टनांपेक्षा जास्त वजनाचे रथ काठीने मोजून बनवले जातात. दरवर्षी नवीन रथ बनवले जातात. हे रथ बनवण्यासाठी अक्षय्य तृतीयेपासून सुरूवात केली जाते आणि गुंडीचा यात्रेच्या दोन दिवस आधी रथ तयार होतात. यात्रा संपल्यानंतर हे रथ तोडले जातात.
शुभ निशाण असलेल्या झाड्यांच्या लाकडापासून हा रथ बनवला जातो. रथासाठी लागणारे लाकूड ओडिशातील मयूरभंज, गंजम आणि क्योंझार जिल्ह्यांतील जंगलातून आणले जाते. पुजारी शुभ मुहूर्त पाहुण ही झाडे ओळखतात. ज्या झाडांवर चक्र, शंख, गदा किंवा पद्म असे चिन्ह दिसतात अशा झाडांची निवड केली जाते. नदी, मंदिर किंवा स्मशानभूमीजवळ असलेली झाडे वा ज्या झाडांवर पक्ष्यांची घरटी किंवा सापांची बिळे असतात अशी झाडे कापली जात नाहीत.
झाडे निवडल्यानंतर त्यांची पूजा केली जाते आणि झाडे तोडण्यासाठी सोन्याची कुऱ्हाड वापरली जाते. लाकूड वसंत पंचमीला पुरीमध्ये पोहोचते. लाकूड तोडण्याचे काम रामनवमीपासून सुरू होते तर रथ बांधण्याची प्रक्रिया अक्षय्य तृतीयेपासून सुरू होते. रथ बनवण्यासाठी फसी, धौरा, सिमली, सहज आणि मही लाकूड वापरतात.

रथाची चाके सर्वात मजबूत लाकडापासून बनवली जातात धौरा. चाकाचा धुरा, ज्या भागाद्वारे चाक रथाला जोडले जाते, तो फासी लाकडापासून बनवला जातो. रथाचा वरचा भाग सिमली लाकडापासून बनवला जातो. बऱ्याच ठिकाणी या कामासाठी सिमलीसोबत माही लाकडाचाही वापर केला जातो. हलके भाग बनवण्यासाठी सहजा लाकडाचा वापर केला जातो. त्याचबरोबर रथाची रचना मोजण्यासाठी २० इंचाची काठी वापरली जाते.
पुरीतील हे मंदिर १२ व्या शतकात बनवण्यात आले होते, या मंदिरात भगवान विष्णुंचे रूप भगवान जगन्नाथ आणि त्यांचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांची श्रद्धेने पूजा आराधना केली जाते. पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेनंतर दरवर्षी रथ विधीपूर्वक नष्ट केले जातात. देवतेचे चल मंदिर मानला जाणारा रथ पुन्हा वापरला जात नाही. मंत्रोच्चारांसह सेवायत रथ विघटित करतात. लाकूड श्रीमंदिराच्या स्वयंपाकात, स्मृतिचिन्हांसाठी किंवा इतर धार्मिक कार्यात वापरले जाते. सजावट व झेंडे पूजनीय मानून जाळले जातात किंवा पुरले जातात. ही प्रक्रिया श्रद्धा आणि परंपरेची जाणीव दर्शवते.