"भारत चीनशी संघर्ष...", राजनाथ सिंह आणि चिनी संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर चीनकडून निवेदन

27 Jun 2025 12:06:24

बीजिंग : (India-China Relationship) चीनच्या क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. द्विपक्षीय संबंधांशी संबंधित मुद्द्द्यांवर या भेटीत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "क्विंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीदरम्यान चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांच्याशी चर्चा झाली. द्विपक्षीय संबंधांशी संबंधित मुद्द्यांवर आमची रचनात्मक आणि भविष्यकाळातील विविध मुद्द्‌यांवर चर्चा झाली. जवळजवळ सहा वर्षांच्या अंतरानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्याबद्दल मी आनंद व्यक्त केला. ही सकारात्मक गती कायम ठेवणे आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन गुंतागुंत निर्माण करणे टाळणे हे दोन्ही देशांचे कर्तव्य आहे."

दरम्यान, या भेटीबाबत चीननेही एक निवेदन जाहीर केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "भारत चीनशी संघर्ष करू इच्छित नाही, संवाद आणि परस्पर विश्वास वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. गुरुवारी भारताने शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, कारण दहशतवादाबाबतची त्यांची चिंता हे यामागील एक प्रमुख कारण होते."

राजनाथ सिंह यांच्याकडून चीनच्या संरक्षण मंत्र्यांना मधुबनी चित्रकला भेट

राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांनी बिहारमधील मधुबनी चित्रकलेचा नमुना भेट स्वरुपात दिला. मधुबनी चित्रकला ही बिहारमधील मिथिला प्रदेशातून आलेली एक प्रसिद्ध भारतीय लोककला आहे. याला मिथिला कला किंवा मधुबनी कला असेही म्हणतात.






Powered By Sangraha 9.0