"तो भारतीय कमी पाकिस्तानी जास्त..."; पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या भारतीय वंशाच्या जोहरान ममदानींवर कंगना राणौतचा हल्लाबोल!

27 Jun 2025 12:53:37

नवी दिल्ली : (Kangana Ranaut on Zohran Mamdani)
भारतीय अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत हिने न्यू यॉर्कच्या महापौरपदासाठी भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "जोहरान ममदानी भारतीयांपेक्षा जास्त पाकिस्तानी वाटतो", असे कंगना यांनी गुरुवारी, २६ जून रोजी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

तत्पूर्वी काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार अभिषेक सिंघवी यांनीही ममदानी यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, "जेव्हा जोहरान ममदानी तोंड उघडतात तेव्हा पाकिस्तानची पीआर टीम सुट्टी घेते. न्यू यॉर्कमधून काल्पनिक गोष्टी कथन करणाऱ्या त्यांच्यासारख्या सहयोगी शत्रूंची भारताला गरज नाही," असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

भाजप खासदार कंगना राणौत यांनीही सिंघवी यांच्या वक्तव्याला सहमती दर्शवत जोहरान ममदानींवर टीकात्म पोस्ट केली आहे. त्यात त्या म्हणाल्या आहेत की, "जोहरान यांची आई पद्मश्री मीरा नायर सर्वोत्तम चित्रपट निर्मात्या आहेत. भारतात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मीरा यांनी मेहमूद ममदानी (गुजराती वंशाचा) या प्रसिद्ध लेखकाशी लग्न केले. त्यांचा मुलगा जोहरान हा भारतीयांपेक्षा जास्त पाकिस्तानी वाटतो. ते आता हिंदू धर्म पुसून टाकण्यास तयार आहेत, व्वा सगळीकडे हीच परिस्थिती आहे."

चित्रपट निर्मात्या मीरा नायर आणि भारतीय वंशाचे युगांडाचे लेखक महमूद ममदानी यांचे पुत्र ममदानी यांना मंगळवारी रात्री डेमोक्रॅटिक महापौरपदाच्या प्राथमिक निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आले. प्राथमिक निवडणुकीत ममदानी यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांचा पराभव करून विजय मिळवला आहे.




Powered By Sangraha 9.0