'पे अँड पार्क' फा-स्टॅगशी जोडा, मानवी हस्तक्षेप विरहित 'पे अँड पार्क' निर्माण करा - मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आढावा बैठकीत सूचना

Total Views |

मुंबई, रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणे महत्त्वाचे आहे. त्याअनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशात नगरविकास विभागाने आपल्या नियमावलीमध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. मुंबई येथे मंत्रालयात शुक्रवार,दि.२७ रोजी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी परिवहन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय सेठी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव असिम गुप्ता, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी- निजामपुर, पनवेल, मीरा-भाईंदर, वसई विरार या महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते.

यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले, भविष्यात शहराच्या विकास आराखड्यात महापालिकेने पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक ठरणार आहे. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने आपल्या नियमावलीमध्ये बदल करून नवीन १४ सुचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिकांना पाठवावा.

यावेळी बोलताना नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता म्हणाले, भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने आपल्या मोकळ्या जागेवर पे ॲड पार्क वर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच, खाजगी सोसायटी व जागा मालकांच्या पूर्व परवानगीने कार्यालयीन वेळेच्या पश्चात म्हणजेच रात्री १२ ते ६ 'पे ॲड पार्क'वर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील महापालिकेने चाचपणी करणे आवश्यक आहे. याबरोबरच जे रस्ते रुंद आहेत, त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारे महापालिकेने एक दिवस आड पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे.

'पे ॲड पार्क'वर आधारित असलेली पार्किंग व्यवस्था ही मनुष्य हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी फास्ट टॅगवर आधारित असल्यास लोकांना त्याचा सहज वापर करणे शक्य होईल. याबरोबरच पार्किंगचे शुल्क हे अतिशय कमी ठेवावेत जेणेकरून लोकांना परवडेल आणि ते सहजगत्या उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील, अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी केली. महानगरातील जागेची कमतरता लक्षात घेता उद्याने व बगीचा याच्या खाली भूमिगत पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, ठाणे शहरांमध्ये ठाणे महापालिकेने अशा प्रकारचा उपक्रम राबवला असून तो पथदर्शक असल्यामुळे इतर महापालिकेने देखील त्याचं अनुकरण करावे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.