ब्रिटनचे डोळे उघडणार का?

26 Jun 2025 21:50:07

ब्रिटनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, मानवतेवर अत्याचार होत आहेत, म्हणत पुन्हा एकदा पॅलेस्टाईन समर्थक रस्त्यावर उतरले. कारण, युनायटेड किंगडममध्ये ‘दहशतवादी प्रतिबंध कायद्या’नुसार ‘पॅलेस्टाईन अॅक्शन’ या पॅलस्टाईन समूहावर कायदेशीर बंदी घालण्यात आली. पॅलेस्टाईन समर्थनाच्या आड हे संघटन देशाचे नुकसान करते, दहशतवादी कृत्य करते, असे ब्रिटनचे म्हणणे. ब्रिटनला खूप उशिरा जाग आली असेच म्हणावे लागेल. कारण, इस्लाम आणि त्याद्वारे वाळवंटातल्या प्राचीनकालीन रीतीपद्धतींनी आता ब्रिटनमध्ये चांगलेच बस्तान बसवले आहे.

त्यामुळेच पॅलेस्टाईन आणि इस्रायल युद्धाचे पडसाद ब्रिटनमध्ये चांगलेच जाणवले. ‘पॅलेस्टाईन अॅक्शन समूह’ यामध्ये अग्रणी आहे. मात्र, या सगळ्याला ते नाव देतात, ‘मानवी स्वातंत्र्य आणि समतेसाठीचा प्रयत्न.’ आतापर्यंत ते रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांचे दंगे करायचे. काही दिवसांपूर्वी ‘पॅलेस्टाईन अॅक्शन’ समूहाचे दोन व्यक्ती ब्रिटनच्या अत्यंत सुरक्षित अशा हवाई दलामध्ये घुसले आणि त्यांनी हवाई दलाच्या तळाची तोडफोड केली. तसेच, हवेतून हवेत इंधन भरणार्या दोन ‘एअरबस वोयाजर’ विमानाचा अरबाईन इंजिनावर लाल रंग टाकला. विमानांचे कॉब्रस क्षतिग्रस्त केले.सुरक्षायंत्रणेवर हल्ला केल्यामुळे ब्रिटनच्या सुरक्षायंत्रणेवरच प्रश्न उभे राहिले. देशाचे हवाईदल तळही पॅलेस्टाईन समर्थक उद्ध्वस्त करत असतील, तर सामान्य जनतेचे काय, असा सूर जनतेत उमटू लागला. त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी जाहीर केले की, ‘रॉयल ब्रीज नॉर्टन’मध्ये घडलेली घटना ही देशासाठी अपमानजनक आहे आणि दोषींवर कारवाई केली जाईल. त्यानंतर ‘पॅलेस्टाईन अॅक्शन समूहा’च्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्याचे सत्र सुरू झाले आणि काही अवधीतच ‘पॅलेस्टाईन अॅक्शन समूहा’वर ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आली.

ब्रिटनमध्ये ‘पॅलेस्टाईन अॅक्शन समूह’ हा काही आताच उगवला असे नाही, तर २०२१ सालीही या समूहाच्या सदस्यांनी इस्रायलशी संबंध असलेल्या ‘युएव्ही टॅक्टिकल सिस्टम्स’ कंपनीच्या छतावर सहा दिवस विरोध प्रदर्शन केले. पॅलेस्टाईनच्या लोकांना मदत करावी आणि इस्रायलपासून वाचवावे, अशी त्यांची मागणी होती. त्यावेळी या आंदोलकांना अटक करण्यात आली नाही. पुढे २०२२ साली ब्रिटन-इस्रायल संबंधावरून याच समूहाने ब्रिटन सरकारविरोधात ‘थेल्स’ उपकरणाच्या कारखान्यामध्ये तोडफोड केली. थोडक्यात, ब्रिटनने इस्रायल तसेच इस्रायल समर्थकांशी कोणताच संबंध ठेवू नये, असे या समूहाचे म्हणणे होते. त्यानुसार इस्रायलच्या शस्त्रनिर्मितीमध्ये सहभागी असलेल्या कंपनी ‘एल्बिट सिस्टम्स’, ‘इतालवी एयरोस्पेस कंपनी लियोनार्डो’, ‘फ्रांसीसी बहुराष्ट्रीय थेल्स’ आणि संयुक्त राज्य अमेरिकेची ‘टेलिडाईन कंपनी’ यांंच्याविरोधात ‘पॅलेस्टाईन अॅक्शन समूह’ हिंसक आंदोलन करत असतो. पण, ते हिंसा करतात ते ब्रिटनमध्ये. त्यामुळे ब्रिटनचे नुकसान होते. त्यामुळेच ब्रिटनने आता ‘पॅलेस्टाईन अॅक्शन समूहा’वरच बंदी घातली.

ब्रिटनच्या ‘पॅलेस्टाईन अॅक्शन समूहा’मध्ये कोण लोक आहेत? तर जे पूर्वी आश्रित म्हणून आलेले होते. मात्र, आता ब्रिटन हा इस्लामिक देश व्हायलाच पाहिजे, असे ठाम मत असलेले मुस्लीम. सध्या युनायटेड किंगडममध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ६.५ टक्के आहे. मात्र, त्या मानाने अल्पसंख्याक असूनही बुरखाबंदी ब्रिटनला परवडणारी नाही, अशी चर्चा ब्रिटनच्या पार्लमेंटला घडवून आणावी लागली. याचे कारण अर्थातच ब्रिटनमध्ये मुस्लिमांची वाढती लोकसंख्या. ब्रिटनच्या राजकारणावरही त्यांचे वर्चस्व. आपल्याकडे जसे मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी विरोधीपक्ष वाटेल ती तडजोड करतात, तसेच चित्र ब्रिटनमध्येही. पण, या सगळ्याचा परिणाम म्हणजे ब्रिटनमध्ये ‘इस्लामोफोबिया’ खर्या अर्थाने स्थिरावला. बहुसंख्य ख्रिश्चन नागरिक मुस्लीम लांगूलचालनाविरोधात उभे राहिले. त्याचेच पडसाद म्हणजे ब्रिटनमध्ये ‘पॅलेस्टाईन अॅक्शन समूहा’वर बंदी घातली गेली. हे सगळे पाहून वाटते, आपल्याकडे पण अशाच काही संघटना आहेत, ज्या म्यानमारच्या मुस्लिमांसाठी, गाझाच्या मुस्लिमांसाठी देशात हिंसा, द्वेष पसरवत असतात. या भारतातील संघटनांवर बंदी येईल का?
Powered By Sangraha 9.0