नवी दिल्ली(Popular Front of India): पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) नेता ए. एस. इस्माईल याला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा, १९६७ (UAPA) अंतर्गत त्याला २२ सप्टेंबर २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. वैद्यकीय कारण देत त्याने दाखल केलेला जामिन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बुधवार, दि. २५ जून रोजी फेटाळून लावला आहे. न्यायालयाने त्याला तिहार तुरूंगात उपचार देता येईल का? असे तुरूंग प्रशासनाला विचारले आहे.
ए. एस. इस्माईल हा मुस्लिम युवकांना भारत सरकार विरूद्ध भडकवतो आणि भारतात इस्लामिक राजवटीच्या स्थापनेसाठी युवकांना कट्टरपंथी बनवण्याचे प्रशिक्षण देत होता. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्याला २२ सप्टेंबर २०२२ रोजी अटक केली होती.
डिसेंबर २०२४ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने जामीनाचा अर्ज फेटाळला होता आणि त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी एम्स (AIIMS) येथील डॉक्टरांचे पथक नेमण्याचे निर्देश दिले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगितले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये इस्माईलला स्ट्रोक आला आणि त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याला दररोज फिजिओथेरपी आणि रक्तदाब देखरेखीची आवश्यकता आहे.
सध्या त्याला तुंरूगात फिजिओथेरपी सुविधा मिळत नाही, म्हणून त्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात वैद्यकीय जामिन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. न्या. के.व्ही. विश्वनाथन आणि न्या. नोंगमेकपम कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने असे नमूद केले की, “ इस्माईलची वैद्यकीय स्थिती आपत्कालीन नाही.” फिजिओथेरपी सुविधा तुंरूगात नसल्याबाबत न्यायालयाने तुंरूग प्रशासनाला नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती दि.२७ जून रोजी न्यायालयासमोर सादर करावी ,असा आदेश दिला आहे.