भास्कर जाधवांच्या स्टेटसनंतर राऊतांचा जळफळाट! म्हणाले, "सुनील राऊतांनासुद्धा मंत्रिमंडळात..."

26 Jun 2025 15:18:13


मुंबई : भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर संजय राऊतांचा चांगलाच जळफळाट झाल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधवांच्या नाराजीच्या चर्चांवर सुनील राऊतांनासुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. म्हणून आम्ही रडत बसलो का? असा सवाल संजय राऊतांनी केला.

भास्कर जाधव यांनी "दिवा तेवत असतानाच त्याला तेलाची गरज असते. तो विझल्यानंतर त्यात तेल टाकणे व्यर्थ आहे. याचप्रमाणे वेळीच माणसांची किंमत करा. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही," असे स्टेटस आपल्या व्हॉट्सअपला ठेवले आहे. त्यामुळे ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

'त्या' बेकऱ्या पर्यावरणपुरक इंधनात बदलण्याचा कार्यक्रम ठरवा; मंत्री आशिष शेलार यांचे महापालिकेला निर्देश

यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळाले नाही. सुनील राऊतांनासुद्धा स्थान मिळाले नाही. त्यांचा हक्क होता. म्हणून आम्ही रडत बसलो का? ती पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी माझे आणि आमच्या कुटुंबाचे योगदान होते. पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात घेतले नाही. मोजक्या जागा असतात. तीन पक्षाचे सरकार होते. त्यामुळे आपण समजून घेतले पाहिजे. आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले आणि ते सोडून गेले. चाणाक्ष, हुशार, तडफदार असे लोक होते. पक्षाने त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय केला आणि आम्ही सगळे त्या निर्णयात सहभागी होतो," असे ते म्हणाले.

भास्कर जाधवांनी पक्षप्रमुखांशी चर्चा करावी!

ते पुढे म्हणाले की, "भास्कर जाधव ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे सहकारी आहेत. त्यांनी येऊन पक्षप्रमुखांशी चर्चा केली पाहिजे. बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशावेळी स्वतः येऊन बोलावे. आम्हीसुद्धा बोलतो. जेव्हा आम्हाला एखाद्या विषयावर चर्चा करावीशी वाटते तेव्हा आम्ही स्वतः उद्धवजींकडे जाऊन चर्चा करतो," असेही संजय राऊत म्हणाले.




Powered By Sangraha 9.0