नवी दिल्ली : (No proposal to levy toll on two-wheelers) देशभरातील दुचाकी वाहनधारकांकडूनही सरकार टोल वसूल करणार असल्याच्या बातम्या गुरुवारी सकाळी समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्या. तथापि, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यावर स्पष्टीकरण देत हे वृत्त दिशाभूल करणारे आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले गडकरी?
नितीन गडकरी यांनी गुरुवारी २६ जून रोजी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, "काही माध्यमांद्वारे दुचाकी वाहनांवर टोल लावण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवण्यात येत आहेत. दुचाकी वाहनांना टोल लावण्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलमधून पूर्णपणे सूट असणार आहे. सत्यता न पडताळता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही. मी याचा निषेध करतो", असे गडकरी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दुचाकी वाहनांच्या टोल आकारणीबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अधिकृत एक्स अकाऊंटवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "असा कोणताही प्रस्ताव भारत सरकारकडून पुनरावलोकन किंवा विचाराधीन नाही." त्यामुळे यासंदर्भात केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केली नव्हती, मात्र विविध माध्यमांनी दिलेल्या अशा प्रकारच्या बातम्यामुळे दुचाकी वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता याच बाबत नितीन गडकरी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.