नवी दिल्ली : आम्ही खासदार शशी थरूर यांच्यावर कुठल्याही प्रकारची पक्षांतर्गत कारवाई करणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. थरूर यांचा ऑपरेशन सिंदूर संदर्भात शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि केंद्र सरकारच्या रणनितीचे कौतूक केले होते. यावरुन काँग्रेस नेत्यानी थरूर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
मोदी सरकारने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी शशी थरूर यांची शिष्टमंडळात निवड केल्यानंतर काँग्रेस नेते पवन खेरा आणि उदित राज यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी थरूरांवर टीका केली. थरूरांवर यामुळे पक्षशिस्त भंग केल्याची कारवाई होणार का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, काँग्रेस पक्ष त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी स्पष्ट केले. बुधवार, दि. २५ जून रोजी काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खरगे बोलत होते.
पक्ष थरूर यांच्यावर कोणती कारवाई करणार का? असे विचारले असता खरगे म्हणाले की, "शिष्टमंडळात ३४ सीडब्ल्यूसी सदस्य आणि ३० विशेष निमंत्रित होते, यातील प्रत्येकजण हा देश प्रथम या भावनेने त्या शिष्टमंडळाचा सदस्य होता. थरूरसुध्दा याच भावनेने शिष्टमंडळाचे नेतृत्व करत होते. शिष्टमंडळाच्या केलेल्या नेतृत्वाबद्दल पक्षांतर्गत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही." असे खरगे म्हणाले. नुकताच थरूर यांनी द हिंदू या वृत्तपत्रात ‘ऑपरेशन सिंदूरची जागतिक पोहोच’, असा शीर्षक असलेला एक लेख लिहिला होता, जिथे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ऊर्जा आणि गतिचे विशेष कौतूक केले होते.
"पंतप्रधान मोदींची देशाप्रती असलेली ऊर्जा, कामाची गती, प्रेम हे जागतिक स्तरावर भारताची एक प्रमुख संपत्ती आहे. ऑपरेशन सिंदूर नंतरचा शिष्टमंडळाचा जागतिक संपर्क हा भारतासाठी प्रभावी संवादाचा क्षण होता. भारत जेव्हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपला प्रभावी आवाज मांडू शकतो" असे थरूर यांनी त्यांच्या लेखात म्हटले होते.