नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीर आज दि. २६ जून रोजी सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचतील. याआधी त्यांनी अंतराळातून लाइव्ह येत त्यांचा आतापर्यंतचा अनुभव सांगितला आहे. अॅक्सियम मिशन ४ अंतर्गत बुधावर दि. २५ जून रोजी चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना झाले. तांत्रिक अडचणींमुळे हे मिशन यापूर्वी सहा वेळा पुढे ढकलण्यात आले होते. काल अखेर या यानाचे यशस्वीपणे प्रक्षेपण पार पडले.
काय म्हणाले शुभांशू शुक्ला?
अंतराळातील आपला अनुभव सांगण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी देशवासियांना अभिवादन केले. ते म्हणाले, "मी माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत इथे येण्यासाठी खूप उत्सुक आहे. खरे सांगायचे तर, काल मी लॉन्चपॅडवरील कॅप्सूलमध्ये बसलो होतो. ३० दिवसांच्या क्वारंटाइननंतर, मला फक्त आता पुढे जाण्याची इच्छा होती. पण जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा असे वाटले की तुम्हाला सीटवर मागे ढकलले जात आहे. ही एक अद्भुत सफर होती. आणि मग अचानक सर्व काही शांत झाले. मी बेल्ट उघडला आणि मी शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात तरंगत होतो. मला याची जाणीव आहे की ही वैयक्तिक कामगिरी नाही, तर या प्रवासाचा भाग असलेल्या तुमच्या सर्वांची ही सामूहिक कामगिरी आहे. मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. तसेच कुटुंब आणि मित्रांनो.. तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. हे सारे काही तुमच्या सगळ्यांमुळे शक्य झाले आहे.
जेव्हा आम्ही व्हॅक्यूममध्ये उतरलो तेव्हा मला फारसे बरे वाटत नव्हते, पण कालपासून मला सांगण्यात आले आहे की मी खूप झोपलो आहे, जे एक चांगले लक्षण आहे. मला वाटते की हे एक उत्तम लक्षण आहे की मी या वातावरणाशी चांगले जुळवून घेत आहे. दृश्यांचा आनंद घेत आहे, संपूर्ण अनुभवाचा आनंद घेत आहे. लहान बाळाप्रमाणे मी चालणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे, खाणे या सगळ्या गोष्टी शिकत आहे. हे एक नवीन वातावरण आहे, नवीन आव्हान आहे आणि मी माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत या अनुभवाचा आनंद घेत आहे. मला एवढेच म्हणायचे आहे, हे शक्य केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मला खात्री आहे की येथे माझा वेळ खूप छान जाईल.