दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांची राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

26 Jun 2025 12:08:27

मुंबई
: राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी दै. 'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. शेलार यांची दुसऱ्यांदा या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समितीमार्फत राज्यातील वन आणि वन्यजीव संदर्भातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मान्यता देण्याचे काम होईल.

वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या कलम ६ क अंतर्गत राज्य वन्यजीव मंडळाची स्थापना करण्यात येते. याचा आधार घेऊन राज्य सरकारकडून राज्य वन्यजीव मंडळाची स्थायी समिती स्थापना होते. वनमंत्री या समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. या समितीमध्ये विधानसभा सदस्य समीर मेघे, बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रतिनिधी, किरण शेलार, धनंजय बापट, चैत्राम पवार यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याखेरीज अपर मुख्य सचिव (वने), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), भारतीय वन्यजीव संस्थानचे प्रतिनिधी, भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाचे प्रतिनिधी, भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण विभागाचे प्रतिनिधी यांची देखील सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) हे असतील.

राज्य वन्यजीव मंडळाकडे येणारे सर्व प्रस्ताव प्रथम स्थायी समितीकडे येतील. स्थायी समिती सर्व प्रस्तावांची वन्यजीव संदर्भात तपासणी करेल. या समितीच्या विचारार्थ आलेल्या प्रस्तावांपैकी खाणकाम, जलविद्युत प्रकल्प, पाटबंधारे प्रकल्प आणि संरक्षित वनक्षेत्रांना अधिघोषित करणे या बाबी वगळून इतर सर्व प्रकल्पांना ही समिती मान्यता प्रदान करेल. तसेच संरक्षित वनक्षेत्रांना अधिसूचित करणे, खाणकाम, जलविद्युत प्रकल्प या बाबींची तपासणी स्थायी समितीद्वारे होईल आणि त्यानंतर या बाबी शिफारसींसह राज्य वन्यजीव मंडळाकडे सादर केल्या जातील. आवश्यकतेनुसार समिती, उपसमिती किंवा अभ्यास गट तयार करण्याचा अधिकार स्थायी समितीला असले. दोन महिन्यातून एकदा या समितीची बैठक पार पडेल.

Powered By Sangraha 9.0