पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसलेल्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास भारताचा नकार! चीनच्या नापाक खेळीनंतर राजनाथ सिंह यांची कठोर भूमिका

    26-Jun-2025   
Total Views |

बीजिंग : (SCO)
चीनमधील क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. राजनाथ सिंह यांनी गुरुवारी २५ जूनला भारताच्या वतीने या बैठकीत सहभाग घेतला होता.

माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केले. यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam terror attack) उल्लेख नसल्याने बैठकीच्या संयुक्त निवेदनावर राजनाथ सिंह यांनी स्वाक्षरी केली नाही. महत्त्वाचे म्हणजे या निवेदनात बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांचा थेट उल्लेख करण्यात आला होता. तसेच पाकिस्तानने वारंवार भारतावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्याचा आरोप केला आहे, जो आरोप भारताने पूर्णपणे नाकारला आहे.


दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका कमकुवत होऊ नये म्हणून राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनाच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे. चीनने या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही निवेदनाचा मसुदा तयार करण्यात यजमान देशाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे पाकिस्तानवरील प्रेमापोटी चीनने दहशतवादाचा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\