मुंबई : "साधेपणा आणि सहिष्णुता हा हिंदू धर्माचा मूलभूत पाया आहे. असे असले तरी भारतभूमीवर कोणी हल्ला केल्यास राष्ट्राचे रक्षण करण्याचे बळही भारतीयांना याच संस्कृतीने दिले. हिंदू धर्मात राष्ट्राचे रक्षण करण्याची शक्ती आहे.", असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांनी केले. समितिच्या 'प्रवीण शिक्षा वर्ग'चा समारोप नुकताच रेशिमबाग नागपूर येथे संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
उपस्थितांना संबोधत पुढे त्या म्हणाल्या, "पहलगाम मधील भ्याड दहशतवादी हल्ल्याला दिलेले प्रत्युत्तर, ऑपरेशन सिंदूर हा स्वाभिमानाचा क्षण होता. या ऑपरेशनमध्ये महिलांचा सहभाग ही देखील अभिमानाची गोष्ट होती. सर्वांचा आदर करणे आणि भेदभावरहित वर्तन हे भारताचे वैशिष्ट्य आहे. समितीच्या कार्यकर्त्या देश, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत."
राष्ट्र सेविका समितिच्या प्रवीण शिक्षा वर्गात देशभरातील १०१ प्रशिक्षणार्थी सहभागी झाल्या होत्या. समारोप कार्यक्रमात समितीच्या प्रशिक्षणार्थींनी व्यायाम आणि योग सादर केले. त्याचबरोबर त्यांनी शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असलेल्या यष्टी आणि दंडाचे प्रात्यक्षिकही सादर केले. राष्ट्रीय सेविका समितीचे उद्दिष्ट उज्ज्वल हिंदू राष्ट्राच्या पुनर्बांधणीसाठी महिलांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या तयार करणे असल्याचे माननीय शांताक्कांनी सांगितले.