नवी दिल्ली : गुजरातमधील अहमदाबाद शहरात गेल्या १२ तासांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून, सध्या अहमदाबादमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वेकडील भागातील मणिनगर, वटवा, सिटीएम, हाटकेश्वर, निकोल ओधव आणि विराट नगर सोबत अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे.
पावसाच्या पाण्यामुळे एक दुचाकीस्वार ड्रेनेज लाईनमध्ये अडकला होता. अग्निशमन विभागाच्या ९ तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याचा मृतदेह ड्रेनेज लाईनपासून पुढे २०० फूट अंतरावर बाहेर काढण्यात आला. या हंगामाच्या सुरुवातीलाच आतापर्यंत अहमदाबाद शहरात ६:०३ इंच पाऊस पडला आहे.
सुरतमध्येही गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गीतानगर परिसर ३ ते ४ फूट पाण्याखाली आहे. याच परिसरात एका गर्भवती महिलेची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर, अग्निशमन दलाच्या मदतीने तिला रुग्णालयात नेण्यात आले.
यापूर्वी, गेल्या २४ तासांत, हिमाचल प्रदेशातील दोन जिल्ह्यांतील जिवा नाला (सैंज), शिलागड (गढसा) खोरे, स्ट्रो गॅलरी (मनाली), होरानगड (बंजर), कांगडा आणि धर्मशाळेच्या खनियारा येथे ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अचानक आलेल्या या पुरात अनेक लोक वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी २ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्याचबरोबर दोन हजारपेक्षा जास्त पर्यटक अजूनही हिमाचलमध्ये अडकले असल्याची माहिती मिळते आहे.
त्याच वेळी, कुल्लूमध्ये २ हजार पर्यटक अडकले आहेत. धरणातून पाणी सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये मान्सूनचा पाऊस सुरूच आहे. बांसवाडा येथे एका दिवसात सर्वाधिक म्हणजेच ८ इंच पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.