मुंबई : उबाठा गटाचे जेष्ठ नेते भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना आता त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांनी दिवा विझल्यावर त्यात तेल टाकण्यात काय अर्थ? अशा आशयाचे स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
"दिवा तेवत असतानाच त्याला तेलाची गरज असते. तो विझल्यानंतर त्यात तेल टाकणे व्यर्थ आहे. याचप्रमाणे वेळीच माणसांची किमंत करा. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही," असे स्टेटस भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअपला ठेवले आहे. त्यांच्या या स्टेटसमुळे पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा उफाळून आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच त्यांनी स्वत:हून राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता त्यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांचे स्टेटस म्हणजे त्यांच्या नाराजीचे संकेत आहेत का? असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, गुरुवार, २६ जून रोजी भास्कर जाधव मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत काय घडतं? भास्कर जाधव नाराज आहेत का? उद्धव ठाकरे त्यांची नाराजी दूर करू शकतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.