शाळा आणि महाविद्यालयांबाहेरील सिगारेट, ड्रग्ज विक्रीबाबत मुंबई हायकोर्टांनी घेतली दखल!

26 Jun 2025 18:17:26

छत्रपती संभाजीनगर(Suo moto on drugs addiction): महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या मादक पदार्थांच्या सेवनाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने चिंता व्यक्त केली आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालयांबाहेर ड्रग्ज, ई-सिगारेट आणि सिगारेटच्या मोठ्या प्रमाणात विक्रीवर प्रकाश टाकणाऱ्या एका बातमीच्या वृत्तांतावर उच्च न्यायालयाने गुरूवार, दि.२५ जून रोजी सुमोटो अंतर्गत दखल घेतली आहे.

न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्या.शिवराज खोब्रागडे यांच्या खंडपीठाने २० जून रोजी प्रकाशित झालेल्या एका वृत्तांतावर तीव्र चिंता व्यक्त केली आणि हे सर्व चित्र "त्रासदायक" असल्याचे म्हटले. “ऐन तारुण्यात तरुण विद्यार्थ्यांना अशा मादक पदार्थांचे सेवन करण्यास प्रवृत्त केले जात आहे, ज्यामुळे त्यांना याचे व्यसन लागत आहे आणि परिणामी त्यांचे शारीरिक नुकसान होत आहे,”असे खंडपीठाने म्हटले आहे. शैक्षणिक संस्थांजवळ काही व्यक्ती बंदी घातलेल्या मादक पदार्थांची विक्री करत आहे. ते तेथील विद्यार्थ्यांना मादक पदार्थांचे सेवन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, असे उच्च न्यायालयाने नमुद केले आहे.

न्यायालय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मादक पदार्थ किंवा ड्रग्ज सेवनाच्या विषयावर एवढे संवेदनशील झाले की, त्यांनी यावर कडक कारवाई करता यावी ,यासाठी वरिष्ठ वकील पी.आर. कटनेश्वरकर यांची न्यायालयाचे मित्र (amicus curiae) म्हणून नेमणूक केली आहे. पुढे न्यायालयाने वकील पी.आर. कटनेश्वरकर यांना जनहित याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. या जनहित याचिकेमुळे न्यायालय राज्य सरकार आणि संबधित अधिकाऱ्यांना मादक पदार्थांच्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊ शकेल.



Powered By Sangraha 9.0