SCO summit : पाकिस्तानला गोंजारणाऱ्या SCO परिषदेत भारताने सुनावले खडेबोल! केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी करुन दिली पहलगाम हल्ल्याची आठवण

26 Jun 2025 19:18:54
 
 SCO summit
 
 
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख न केल्याने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेला चांगलेच फटकारले आहे. तसेच या संघटनेच्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यासही नकार देण्यात आला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेकरता भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या चीन दौऱ्यावर आहेत. या परिषदेत संपूर्ण जगाला दहशतवासंदर्भात कडक इशारा देत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला फटकारले. शांघाय सहकार्य संघटनेच्या निवेदनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नव्हता यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.
 
पहलगाम हल्यानंतर प्रथमच, चीनच्या किंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत पहिल्यांदाच भारत आणि पाकचे संरक्षणमंत्री आमनेसामने आले होते. या परिषदेत भारत, रशिया, चीन, पाकसह इतर देशांचे दहा संरक्षण मंत्री एकाच मंचावर होते. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण पाकिस्तानला करुन दिली. यावेळी पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांना राजनाथ सिंह यांनी चांगलेच फटकारले. ते म्हणाले, “निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. काही देश हे दहशतवादाला पोसतात. यापुढेही भारत अशांना जशास तसे उत्तर देईल.”
 
एससीओ परिषदेत सहभागी झालेल्या इतर देशांनाही दहशतवादाविरुद्ध एकत्रित येत लढण्याचे आवाहनसुद्धा यावेळी त्यांनी यांनी केले. राजनाथ सिंह म्हणाले की, "भारत दहशतवादाला पोसणाऱ्या देशांचा दुटप्पीपणा सहन करणारा देश नाही. जे देश हा दुटप्पीपणा करतात अशा देशांची शांघाय सहकार्य संघटनेने उघडपणे पोलखोल करावी आणि त्यांनी पोसलेल्या दहशतवादाविरुद्ध कठोरात कठोर भूमिका घ्यावी."
 
 
Powered By Sangraha 9.0