नागपूर जिल्ह्यातील पाणी योजनांची कामे तातडीने मार्गी लावा- महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या दालनात बैठक

25 Jun 2025 18:18:58

मुंबई, नागपूर जिल्ह्यात जलजीवन मिशन आणि राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत अनेक कामे मंजूर असलेली कामे प्राधान्याने हाती घेणे आवश्यक आहेत. योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात येईल. मात्र, दर्जेदार आणि वेळेत कामे झाली पाहिजेत, असे आदेश महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, जलजीवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल तसेच पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूरमधील जीवन प्राधिकरणाच्या काही योजना प्रलंबित आहेत. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर काही योजना सुरु झालेल्या नाहीत. या योजना तातडीने सुरु करण्यात याव्यात. यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तो उपलब्ध करुन देण्याबाबत नियोजन करण्यात येईल. निलडोह - लिंगडोह या योजनांनाही निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी वित्त विभागाशी चर्चा करुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. कामठी छावणी परिषदेसाठीही तातडीने निधी उपलब्ध झाल्यानंतर ते काम पूर्ण करुन घ्यावे.

नागपूर पेरी अर्बन अंतर्गत १२ गावांचा समावेश होतो. यामध्ये बेसा, बेलतरोडी, घोगली, पिपळा, बहादूरा, गोन्हीसीम, खरबी, बिडगाव, तरोडी, शंकरपूर, हुडकेश्वर, कापसी या गावांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. नगर पंचायत आणि ग्रामपंचायत यांच्याकडे वितरण व्यवस्थेची देखभाल दुरुस्ती आणि पाण्याची देयके वसूल करण्याची जबाबदारी राहील. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात यावा त्यालाही मंजूरी देण्यात येईल.

पाणी पातळीत वाढ होण्याची आवश्यकता

राज्यात अनेक ठिकाणी जमीनीतील पाणीपातळी खाली गेली आहे. ती कमी करण्यासाठी ओढे आणि नाल्यांमध्ये बोअर मारण्याची आवश्यकता आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाने प्रस्ताव तयार करावा. प्रत्येक जिल्ह्यात किमान ५०० बोर मारण्यात येतील अशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच बंद पडलेल्या बोअर वेल पुन्हा सुरु करण्याबाबतही योजना तयार करण्याचे आदेश यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.




Powered By Sangraha 9.0