‘घटखर्पर’ : ‘मेघदूता’चा कच्चा आराखडा?

25 Jun 2025 22:28:19

कविकुलगुरू कालिदास रचित ‘मेघदूत’ या महाकाव्यातील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे आजचा ‘आषाढ प्रतिपदा’ हा दिवस ‘महाकवी कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘मेघदूता’चा प्रेरणास्रोत म्हणून उल्लेख असलेले ‘घटखर्पर’ हे काव्य अन्य कुणी शब्दबद्ध केले की तो ‘मेघदूता’चाच कालिदासांनी केलेला सराव होता, याविषयी मतमतांतरे आहेत. त्यानिमित्ताने ‘घटखर्पर’ची काव्यमीमांसा करणारा हा लेख...

भारतीय आणि भारतीय संवेदनशील मनांना अनेक शतकं साद घालणारं काव्य म्हणजे ‘मेघदूत’ असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. निसर्ग आणि मानव यांची समरसता हा कालिदासाचा विशेष या काव्यात उमटला आहेच. कालिदासाच्या सर्व कृतींची आस्वादक समीक्षा भारतीय आणि पाश्चिमात्य टीकाकारांनी केली. भारतीय आणि पाश्चात्य विचारसरणी एकत्र आल्यामुळे संस्कृत वाङ्मयाच्या समीक्षेची दिशा अधिक समृद्ध झाली. आधुनिक समीक्षेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे साहित्यकृतीचं उगमस्थान शोधणं. ‘मेघदूता’चा प्रेरणास्रोत म्हणून ज्याचा मुख्य उल्लेख केला जातो, ते काव्य म्हणजे ‘घटखर्पर’ किंवा ‘घटकर्पर’ काव्य. ‘घट’ म्हणजे ‘घडा’ आणि ‘कर्पर’ म्हणजे ‘खापर.’ ‘कर्पर’ आणि ‘खर्पर’ या दोन्ही शब्दांचा अर्थ ‘खापर’ असाच आहे. हे नाव थोडंसं चमत्कारिक आहे. पण, या नावाचं मर्म या काव्यातल्या शेवटच्या श्लोकात लपलेलं आहे.

‘घटखर्पर’च्या कवीला यमक अलंकाराचं आकर्षण होतं. म्हणून काव्य पूर्ण झाल्यावर "माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं यमकाधिष्ठित काव्य जर कोणी लिहून दाखवलं, तर मी त्याच्या घरी पाणी भरीन, तेही मडयाच्या खापरामधून, अर्थातच फुटलेल्या मडयाच्या खापरामधून! मला खूप कष्ट होतील, पण मी ते करीन,” अशी प्रतिज्ञाच कवीने शेवटच्या श्लोकात केली आहे. त्या श्लोकाचा भावार्थ आहे, "प्रेमात बुडालेल्या स्त्रीच्या कामक्रीडांना आसावलेला मी ओंजळीत घेतलेल्या पाण्याला स्पर्शून शपथ घेतो की, जो कोणी दुसरा कवी मला यमकरचनेमध्ये जिंकेल, त्याच्यासाठी मी मडयाच्या खापरामधून (घटखर्परामधून) पाणी भरीन!”

प्रस्तुत काव्यातल्या हा श्लोक खूप प्रसिद्ध झाल्यामुळे कवीचं मूळ नाव विस्मृतीत गेलं आणि तो ‘घटखर्पर’ नावाने प्रसिद्ध झाला. या कवीचं व्यक्तिमत्त्वच गूढ बनून गेलं. तो कोण होता, कुठं जन्मला, त्यानं इतर काही काव्य, साहित्य लिहिलं आहे का, इ. मनात सहज येणार्या प्रश्नांची वास्तविक उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. त्यांच्याबद्दल अनेक दंतकथा मात्र निर्माण झाल्या.

त्यातली महत्त्वाची दंतकथा म्हणजे, हा कवी विक्रमादित्याच्या दरबारात नवरत्नांपैकी एक होता. या नवरत्नांमध्ये कालिदासाचीही वर्णी लागली होतीच. संस्कृत वाङ्मयातल्या अनेक राजांच्या दरबारात अनेक प्रसिद्ध साहित्यकारांना काळाचा विचार न करता एकत्र बसवलं जातं. ही कथाही त्या प्रकारचीच असावी. घटखर्पर आणि कालिदास दोघेही प्रतिभावान कवी, दोघेही विक्रमादित्याच्या दरबारात. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा होती, या समजुतीतून अनेक कथा निर्माण झाल्या.

घटखर्पराची आणखी एक ओळख म्हणजे, घटखर्पर दुसरा-तिसरा कुणी नसून प्रत्यक्ष कालिदासच होता, ही कल्पना. ‘मेघदूत’ हे पहिले संदेशकाव्य लिहिण्यापूर्वी त्याने सराव म्हणून ‘घटखर्पर’ काव्य लिहिले, अशी एक कल्पना प्रसृत झाली.

एक तरुण पत्नी आपल्या परदेशी पतीला मेघाबरोबर निरोप पाठवते, ही या यमकाधिष्ठित ‘घटखर्पर’ काव्याची कथा आहे. ‘मेघदूता’चा प्रेरणास्रोत म्हणून ओळखलं जाणार्या या ‘घटखर्पर’ काव्यात २२ श्लोक आहेत. वर्षावर्णन, विरहिणी पत्नीचा पतीला संदेश, विरहिणी नायिका आणि तिची सखी यांचा संवाद, त्यानंतर स्वगत आणि शेवटी कवीचे दोन श्लोक अशी या काव्याची रचना आहे.

या काव्यावर एकूण सात टीका आहेत. त्यातली महत्त्वाची ‘घटकर्परविवृति’ नावाची टीका अभिनवगुप्ताने (इ. स. १०वे -११वे शतक) लिहिली आहे. अभिनवगुप्त हा काश्मीरमधला मर्मज्ञ साहित्यशास्त्रकार. तो काश्मीर शैवागमाचा पुरस्कर्ता होता. त्याच्या लेखी हे काव्य कालिदासानेच रचलं आहे. दुसरं म्हणजे, ‘ज्या काव्यात ध्वन्यर्थ असतो, ते श्रेष्ठ काव्य,’ असं मत आनंदवर्धनाने ’ध्वन्यालोक’ नावाच्या ग्रंथामध्ये व्यक्त केलं आहे. अभिनवगुप्त हा आनंदवर्धनाचा शिष्य. अलंकारांवर भर दिला, तर उत्तम काव्याची हानी होते, असं मत आनंदवर्धन, अभिनवगुप्त आणि मम्मट हे साहित्यशास्त्रकार मानतात. असे मत असणार्या अभिनवगुप्ताची ‘घटखर्पर’ काव्यावर टीका लिहिताना तर खूपच पंचाईत झाली. आनंदवर्धनानेच ‘ध्वन्यालोक’मध्ये एक श्लोक लिहिला आहे. त्या श्लोकानुसार, विप्रलम्भ शृंगाराच्या वर्णनात यमक अलंकाराचा अडथळा होतो. आता ‘घटखर्पर’ काव्याची नायिका प्रोषितभर्तृका आहे. तिचा पती प्रवासाला गेला आहे. त्यामुळे या काव्यात वियोग आहे. म्हणजेच विप्रलम्भ शृंगार आहे. मग अशा काव्यात यमक अलंकार कवीने वापरायला नको होता. एकीकडे हे आनंदवर्धनाचं मत आणि दुसरीकडे ‘घटखर्पर’सारखं श्रेष्ठ काव्य. यांचं समीक्षण कसं करायचं? साधारणतः, भारतीय टीकाकार कवीचे दोष दाखवत नाहीत. यावर अभिनवगुप्त म्हणतो, आनंदवर्धनाचं मत ही काही राजाज्ञा नाही. ती पाळायलाच हवी असं काही नाही. कवी स्वतंत्रप्रज्ञ असतात, कोणते शब्द वापरावेत, ते कसे वापरावेत, याबद्दल त्यांना कुणी नियमांमध्ये करकचून बांधू शकत नाही. कालिदासाने विप्रलम्भ शृंगार वर्णन करण्यासाठी या काव्यात यमकाचा वापर केला, ते त्याला वाटलं म्हणून. यात गैर काहीच नाही.

अभिनवगुप्तासारख्या श्रेष्ठ साहित्यकाराने जरी हे काव्य कालिदासाचं म्हणून शिरोधार्य मानलं असलं, तरी हे काव्य आणि ‘मेघदूत’ यांची तुलना करता, ‘मेघदूत’ अनेक बाबींमध्ये सरस ठरते. या काव्याची कथा अगदी ‘मेघदूता’च्या उलटी आहे. ‘मेघदूत’मधला नायक मेघाकरवी आपल्या पत्नीला निरोप पाठवतो, तर ‘घटखर्पर’ काव्याची नायिका मेघाबरोबर आपल्या पतीला संदेश पाठवते. अर्थातच, हे श्रेष्ठत्वाचं गमक नाही. ‘घटखर्पर’ काव्यातली निसर्गचित्रणं जिवंत नाहीत, कालिदास त्यातल्या निसर्गाच्या बारिकसारिक छटा उलगडून सांगतो, जिवंत करतो. असं ‘घटखर्पर’ काव्यात कुठेही आढळत नाही. इथे निसर्ग आणि मानव एकजीव होत नाहीत, निसर्गही काव्यात कोंबल्यासारखा वाटतो. वानगीदाखल एक श्लोक पाहूया,

‘घटखर्पर’मधील विरहिणी हंसदेखील मानसरोवराकडे चालले आहेत, हे यमकाकडे लक्ष पुरवून अगदी कर्ता, कर्म, क्रियापद इ.चा मेळ साधून गद्य शब्दांत सांगते. या श्लोकात घटखर्परने हंस, चातक आणि प्रिया यांना एकत्र आणलंय. पण, ते एकवटलेले नाहीत. त्यात कोणतेही सूचन दिसत नाही. त्यामधून वाचकांच्या मनात कोणतेच भाव उचंबळत नाहीत. तो श्लोक आहे,

हंसपङ्क्तिरपि नाथ संप्रति
प्रस्थिता वियति मानसं प्रति|
चातकश्च तृषितोऽम्बु याचते
दुःखिता पथिक सा प्रिया च ते॥४॥


अर्थात, हे नाथा, आता ही हंसांची मालाही आकाशातून मानसाकडे चालली आहे. तहानलेला चातकदेखील जलाची याचना करत आहे आणि तुझी ती प्रेयसी दुःखी आहे.)

याउलट कालिदासाने राजहंसांचं मेघागमानंतरचं वर्णन केलंय,

कर्तुं यच्च प्रभवति महीमुच्छिलीन्ध्रामवन्ध्याम्
तच्छ्रुत्वा ते श्रवणसुभगं गर्जितं मानसोत्काः|
आ कैलासाद्बिसकिसलयच्छेदपाथेयवन्तः|
संपत्स्यन्ते नभसि भवतो राजहंसाः सहायाः॥ (पूर्वमेघ ११)


अर्थात, जी अनेक कोंब उगवून या भूमीला सुफल करते, ती तुझी कानाला गोड लागणारी गर्जना ऐकून मानसरोवराची ओढ लागलेले राजहंस कमलाच्या देठातले नाजूक तंतू शिदोरी म्हणून घेऊन कैलास पर्वतापर्यंत तुझी सोबत करतील.

या श्लोकामधून कालिदासानं कितीतरी गोष्टी ध्वनित केल्या आहेत. पावसाळा सुरू झाला की सृष्टीमध्ये नवचैतन्य येते, भूमीवर नवनवीन वनस्पती जन्म घेतात. ही नवनिर्मिती होणार याचा आनंद फक्त भूमीला नाही, तर सर्व सृष्टीला झालाय. राजहंस हे या श्लोकात संपूर्ण जीवसृष्टीचं प्रतीक आहे. पृथ्वीवर वनस्पती उगवण्याची सुरुवात होणं आणि राजहंसांना मानसरोवराकडे परतावं वाटणं, यांचं कारण एकच आहे, ते म्हणजे वर्षागमनाची सूचना देणारी मेघगर्जना. या दोन्ही गोष्टी तशा पाहिल्या, तर मानवी सृष्टीच्या मानानं दुय्यम. पण, त्यांना कालिदासाने एकजीव केलं आणि मानवांच्या जोडीला आणून ठेवलं. इथले राजहंस चित्रातले वाटत नाहीत. त्यांच्या हालचाली डोळ्यांसमोर येतात. इतकंच काय, पण त्यांच्या चोचीमध्ये कमलतंतू आहेत, हेही लक्षात येतं. त्यांना आनंद झालाय. ‘मानसोत्क’ या शब्दामधून त्यांना मानसरोवराची ओढ लागली आहे, हे रसिक मन चटकन समजू शकतं.
‘मेघदूता’चं सौंदर्य खुललंय ते मेघाला सांगितलेल्या मार्गामुळे. मेघमार्ग हा ‘मेघदूता’मध्ये अगदी अलगद गुंफला गेला आहे. रामगिरीपासून अलकानगरीपर्यंत कसं जावं, हे यक्ष मेघाला इतया बारिकसारिक तपशीलांनिशी सांगतो. वाटेत वाहणार्या नद्या, दिसणारे पर्वत, प्रसिद्ध गावं इ. मेघमार्गाचं रसरशीत चित्रण हाच मेघदूताचा गाभा आहे. या निसर्ग घटकांवर मानवी भावनांचं आरोपण करून त्यांना मानवी जीवनाचा भाग बनवून टाकणं, हे कालिदासाच्या प्रतिभेचं कसब ‘ऋतुसंहारा’तही दिसतं. शाकुंतल आणि मेघदूत तर यामुळेच अजरामर झालेत. हा विशेष ‘घटखर्पर’ काव्यात कुठंही दिसत नाही. म्हणूनच ‘घटखर्पर’ काव्य हा मेघदूताचा कच्चा आराखडा आहे, हा समज थोडासा अवाजवी वाटतो.

निर्मला कुलकर्णी
(लेखिका संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.)


Powered By Sangraha 9.0