उंदीर मारण्याची मोहिम संशयास्पद, चौकशी करा; मंत्री अॅड आशिष शेलार यांचे निर्देश

25 Jun 2025 21:02:31

मुंबई :
मुंबई महापालिकेने गेल्या सहा महिन्यात २ लाख ५० हजार उंदरांचा खात्मा केल्याची बाब संशयास्पद आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यातील उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी बुधवार, २५ जून रोजी दिले.

मुंबईतील वाढते डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण आणि त्यावरच्या उपाययोजनांसदर्भात मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अमित सैनी, अभिजीत बांगर महापालिका कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्यासह सरकारच्या आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते

महापालिकेने गेल्या सहा महिन्यात २ लाख ५० हजार उंदरांचा खात्मा केला. १ जून ते २१ जून या कालखंडामध्ये विषारी गोळ्या वापरून मारलेल्या मूळकांची संख्या १ हजार ७४१ असून पिंजरे लावून पकडलेल्या मोक्षकांची संख्या २ हजार १५ इतकी आहे. १७ वॉर्डमध्ये १७ संस्था हे काम करतात, तर महापालिकेचे कर्मचारी पिंजरा लावून उंदीर पकडण्याचे काम करतात. ही सर्व आकडेवारी एकूणच संशयास्पद असून किती उंदीर मारले? त्यांना कुठे पुरले गेले? किती विभागात ही कारवाई करण्यात आली? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का? यासंदर्भात गेल्या तीन महिन्यातील मोहीमेची चौकशी करण्यात यावी, असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी दिले.

सर्वच प्रकरण संशयास्पद

दरम्यान, गेली अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक, विधान परिषदेत आमदार आणि तीन टर्म विधानसभेचा आमदार म्हणून मुंबईत काम करत आहे. आपल्याला अशा प्रकारचे उंदीर कधी मारल्याचे निदर्शनास आलेले नाही. कुठे पिंजरा लावल्याचे कधी पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून अहवाल सादर करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनात आल्याने मुंबई महापालिकेने १ जून ते २१ जून २०२५ या कालखंडात ६ लाख ३९ हजार ४३० घरांचे सर्वेक्षण केले. यात एकूण ३० लाख ५६ हजार ५२८ लोकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले. यापैकी एकूण १ लाख २ हजार २४३ रक्तांचे नमुने गोळा केले आहेत. यामध्ये लेप्टो संशयित रुग्णांची संख्या ६२ हजार ४८४ असून त्यासाठी ३७ शिबिरे घेण्यात आली. तर गॅस्ट्रोसाठी एकूण २१ हजार ४२९ ओआरएस गोळ्या वितरित करण्यात आल्या आहेत. तसेच ११ हजार ८६ क्लोरीन टॅबचे वितरण करण्यात आले आहे.

२५ टक्क्यांनी उपाययोजना वाढवा

दिनांक १ जून २१ जून या कालावधीत या उपायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तसेच मलेरिया नियंत्रणासाठी १७ हजार ८२ इमारतींची तपासणी केली असून डास मारण्यासाठी ३५ हजार ९११ इमारतींच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली. तर ५ लाख ५८ हजार २६१ झोपडपट्टी विभागात फवारणी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपायोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये या सर्व उपाययोजना २५ टक्क्यांनी वाढवा, असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

१ ते २१ जून पर्यंत मुंबईतील रुग्णांची संख्या

मलेरिया - ५५४ रुग्ण

डेंग्यू - ७१

चिकनगुनिया - ६

लेप्टोस्पायरसिस - २४

गॅस्ट्रो - ६२०

यासोबतच जानेवारी ते मे २०२४ या कालखंडात मलेरियाचे १ हजार ६१२ रुग्ण आढळले होते. तर यावर्षी १ हजार ९७३ रुग्ण आढळले आहेत. तसेच मागील वर्षी डेंग्यूचे ३३८ रुग्ण आढळून आले असून जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत ३४७ रुग्ण आढळून आले आहेत.
Powered By Sangraha 9.0