‘मतदानात फेरफार’चा आरोप! हायकोर्ट म्हणाले, “आमचा वेळ वाया गेला!”; प्रकाश आंबेडकर यांच्या याचिकेवर सुनावणी

25 Jun 2025 19:04:03


मुंबई(Election Petition): २०२४मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवार, दि. २५ जून रोजी फेटाळून लावली. चेतन अहिरे यांनी वंचित पक्षाचे अध्यक्ष वकिल प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५ लाखांहून अधिक मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

सायंकाळी सहा वाजता ७५ लाखांहून अधिक मतदान होणे कसे शक्य आहे?, असा युक्तीवाद अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. सुमारे ९५ मतदारसंघांमध्ये मतदान झालेल्या मतांची संख्या आणि मोजलेल्या मतांची संख्या जुळत नाही. मतांच्या नोंदीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगाने मतदान करण्यासाठी जारी केलेल्या 'हँडबुक'मध्ये नमूद केलेल्या निकषांचे पालन करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे अशा विविध निकषांचे उल्लंघन झाले असल्याने विधानसभा निवडणुकीचे निकाल रद्द करावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती.

“या याचिकेने न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालविला आहे. कारण संपूर्ण दिवस याच सुनावणीसाठी दिला आहे. याचिकाकर्त्योवर आमचा वाया गेलेल्या वेळेबाबत खर्च लावला पाहिजे, पण आम्ही तसे करणार नाही.”, असे न्या. गिरीश कुलकर्णी यांनी फटकारले. याचिकेची सुनावणीत न्या. आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे पार पडली. आदेशाची प्रत न्यायालय रजिस्ट्रारकडून अधिकृत वेबसाईटवर अपलोड केली नाही. आदेशाची प्रत आल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.



Powered By Sangraha 9.0