मुंबई : हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली असून आता पक्षाने पुन्हा एक नवीन मोहिम हाती घेतली आहे. या माध्यमातून राज्यभरातून गुगल फॉर्मद्वारे नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने सुधारित शासन निर्णय जारी करत हिंदी अनिवार्य न ठेवता आवश्यकतेनुसार तिसरी भाषा शिकवली जाईल, असे सांगितले होते.
दरम्यान, मनसेकडून या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात येत आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेकडून वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांचे नेतृत्वाखाली हिंदी सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी मोहिम हाती घेण्यात आली.
त्यानंतर आता मनसेकडून पुन्हा एक नवीन मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये गुगल फॉर्मद्वारे हिंदी भाषा सक्तीसंदर्भात राज्यभरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी एक गुगल फॉर्मदेखील तयार करण्यात आला आहे.