आणीबाणी म्हणजे हुकूमशाही प्रवृत्तीचे प्रकट स्वरुप : अमित शहा ; संविधानाला लक्ष्य केले होते हे विसरून चालणार नाही

    25-Jun-2025
Total Views | 12

नवी दिल्ली : “भारतीय संविधानाचा पाया अतिशय बळकट आहे. हुकूमशाहांनी संविधानास लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यास काय होते, हे भारतीय जनतेने इंदिरा गांधींना दाखवून दिले होते. त्यामुळे भारतीय संविधानास लक्ष्य करणार्‍या आणीबाणीस कदापिही विसरून चालणार नाही,” असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केले.

‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाऊंडेशन’तर्फे ‘आपत्काल के 50 साल’ विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “आणीबाणीला आता 50 वर्षे पूर्ण झाली असून एवढ्या जुन्या घटनेच्या स्मृती जागविण्याचा, संविधान हत्या दिवस जाहीर करण्याचे कारण काय, असा सवाल देशातील अनेकांकडून विचारला जातो. चांगल्या किंवा वाईट राष्ट्रीय घटनेच्या स्मृती0 वर्षांनी साहजिकच धूसर होतात. त्यामुळे आणीबाणी नेमकी काय होती आणि भारतीय संविधानाची कशी हत्या करण्यात आली, याविषयी नव्या पिढीस माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठीच अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे,” असे केंद्रीय मंत्री शाह यांनी म्हटले.

“लोकशाही हा भारताचा जनस्वभाव आहे,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “आणीबाणीसाठी विविध तर्क समर्थकांकडून देण्यात येतात. मात्र, आणीबाणीचा विचार मानवी संवेदना आणि कल्पनेच्या दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे. लोकशाही आणि हुकूमशाही ही मानवी प्रवृत्ती आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनातील हुकूमशाही प्रवृत्ती जागृत झाली की काय होते आणि त्या प्रवृत्तीचा सामना लोकशाही पद्धतीने केले की काय होते, हे आणीबाणी आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांनी दाखवून दिले होते.

आणीबाणीविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, जनसंघ, समाजवादी, सर्वोदयवादी कार्यकर्ते, पत्रकार आणि संपादकांनी लढा दिला होता. त्यासोबतच स्वतंत्र विचारांच्या नागरिकांनीदेखील अतिशय शांतपणे लढा दिला होता. त्यांनी आपल्या अभिव्यक्तीचे प्रदर्शन निवडणुकीद्वारे करून हुकूमशाही प्रवृत्तीस जागा दाखवून दिली,” असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121