आणीबाणीच्या काळात लोकशाहीची हत्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
25 Jun 2025 13:14:59
मुंबई : आणीबाणीच्या काळ्या कालखंडाला आज ५० वर्ष पूर्ण होत असून त्याकाळात भारतात लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बुधवार, २५ जून रोजी राजभवन येथे 'संविधान हत्या दिवस' आणि आणीबाणी विरोधी संघर्ष केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ 'लोकशाही सोहळा' आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "१२ जून १९७५ ला अलाहाबाद हायकोर्टाने इंदिराजींची लोकसभेची निवड अवैध असल्याचा निर्णय दिला. सरकारच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे निवडणूकीचे काम केले आणि सरकारच्या तिजोरीतून मतदारांना पैसा वाटला गेला. ही निवडणूक पूर्णपणे लोकशाहीच्या तत्वांच्या विरोधात लढवली गेल्याने इंदिराजींची निवडणूक रद्द करण्यात आली. त्यानंतर बरोब्बर १३ दिवसांनी २५ जून रोजी इंदिराजींनी या देशात आणीबाणी लागू केली. देशभरातील संपूर्ण परिस्थिती पाहता आता आपली सत्ता वाचवणे कठीण आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आणीबाणी लागू केली."
"त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील लाखों नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. संविधानाची हत्या करण्यात आली. ४२ वी घटनादुरुस्ती करत एक छोटे संविधान तयार करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पूर्णपणे बदलण्याचे काम झाले. बाबासाहेबांच्या संविधानाची हत्या करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे वर्चस्व काढून टाकत त्यांचे अधिकार संपवून टाकले. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी सगळे विरोधी पक्ष एकत्रितपणे उतरले त्यावेळी आणीबाणी लावून लोकांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यानंतर २० कलमी, ५ कलमी, ११ कलमी असे कार्यक्रम लावण्यात आले. हे कार्यक्रम म्हणजे या देशात ठोकशाहीची आणि तानाशाहीची नांदी होती," असे ते म्हणाले.
अनुशासनाच्या नावाखाली उन्माद!
ते पुढे म्हणाले की, "ज्यांचे लग्न झाले नाही अशा लोकांचेही कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यात आले. अनेक जागा बळकावल्या, घरांची तोडफोड केली. त्या कालखंडात अनुशासनाच्या नावाखाली या देशात उन्माद पाहायला मिळाला. हे सगळे बाहेर येऊ नये यासाठी वृत्तपत्रांची छपाई बंद करण्यात आली. त्यावेळी तुरुंगात असलेल्या लोकांवरसुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. अनेकांची घरेदारे आणि कुटुंब उध्वस्त झाली," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.