२५ आठवड्यांच्या गर्भपातास मुंबई हायकोर्टाने दिली परवानगी! खर्चासाठी अविवाहित महिलेला प्रियकर देणार १ लाख रुपये!

25 Jun 2025 15:55:47

मुंबई(Abortion of a 25-week fetus): वैद्यकीय गर्भपात कायद्याअंतर्गत(एमटीपी) एका ३१ वर्षाच्या अविवाहित महिलेने २५ आठवड्यांच्या गर्भाचा गर्भपात करण्यास परवानगी मिळवण्या मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवार दि.२४ जून रोजी गर्भपात करण्यास सहमती दर्शवली आहे. याचिकाकर्ता, गर्भवती महिला जोडीदाराने साथ सोडल्यामुळे समाजाच्या भीतीने हतबल झाली होती. यात जोडीदाराला न्यायालयाने दोषी ठरवत याचिकाकर्त्याच्या वैद्यकीय आणि कायदेशीर खर्चासाठी तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे.

याचिकाकर्त्याच्या गर्भपाताबद्दल न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने असे म्हटले की, “या महिलेच्या प्रियकराने ती गर्भवती राहिल्यानंतर तिची जबाबदारी झटकली आणि तिला कोणत्याही प्रकारची मदत करण्यास नकार दिल्यामुळे ती अडचणीत सापडली. समाजात नाचक्की होईल तसेच तिच्या स्वतःच्या आईवडीलांना याबद्दल कळाल्यास काय होईल, याची भीती होती. अशा परिस्थितीत तिला पाठिंबा देण्यास नकार देणाऱ्या प्रियकराला दोषी ठरवत आहोत. आणि आमच्या चेंबरमध्ये त्याला याचिकाकर्त्यासोबत उपस्थित राहण्याचा आदेश देत आहोत." असे खंडपीठाने दि. १९ जून रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते.

यानंतर, दि. २४ जून रोजी महिलेचा प्रियकर न्यायाधीशांसमोर हजर झाल्याने खंडपीठाने म्हटले की, " ताबडतोब याचिकाकर्त्याच्या वैद्यकीय आणि कायदेशीर खर्चासाठी तिच्या खात्यात १,००,०००/- रुपये जमा करणे आणि तिच्यासोबत तो रुग्णालयात जाईल आणि जोवर गर्भपाताची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर तिच्यासोबत राहील.” असा आदेश देत न्यायालयाने याचिकाकर्त्या महिलेला वैद्यकीय गर्भपात कायद्याअंतर्गत वाडिया रूग्णालयात गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे.



Powered By Sangraha 9.0