नवी दिल्ली : (Axiom-4 Mission) भारताच्या अंतराळ प्रवासातील आजचा दिवस अविस्मरणीय ठरला आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि इस्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) यांनी २५ जून रोजी दुपारी १२ वाजता यशस्वीरित्या अवकाशात झेप घेत नवा इतिहास रचला आहे. Axiom-4 या खासगी अंतराळ मोहिमेअंतर्गत ते चार सदस्यीय अंतराळवीर पथकासोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच आयएसएसकडे रवाना झाले आहेत. ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
खराब हवामान आणि तांत्रिक अडचणींमुळे अॅक्सिओम-४ हे मिशन तब्बल सहा वेळा पुढे ढकलण्यात आले होते. मोहिमेला प्रथम हवामानामुळे विलंब झाला, नंतर फाल्कन-9 रॉकेटमध्ये गळती आणि नंतर रशियन मॉड्यूलमधील तांत्रिक समस्यांमुळे ते पुढे ढकलण्यात आले. अलिकडेच नासा आणि रशियाची अंतराळ संस्था रोसकॉसमॉस यांनी आयएसएसच्या झ्वेझदा सर्व्हिस मॉड्यूलमधील दुरुस्तीच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला. बुधवारी होणाऱ्या प्रक्षेपणापूर्वी स्पेसएक्सने मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. आणि यानंतर अखेर या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण पार पडले.
अॅक्सिओम- मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्यांच्यासोबत तीन अंतराळवीर यांनी अंतराळाच्या दिशेने झेप घेतली आहे. या मोहिमेचं नेतृत्व नासाचे माजी अंतराळवीर आणि अॅक्सिओम स्पेसच्या मानवी अंतराळ उड्डाण संचालक पेगी व्हिटसन करत आहेत. भारताच्या इस्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला मिशन पायलट म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. या मोहिमेत पोलंडचे स्लावोस उज्नान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापु हे मिशन विशेषज्ञ म्हणून सहभागी झाले आहेत.
ॲक्सिओम मिशन ४ अंतर्गत या अंतराळवीरांनी भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील लाँचपॅड 39A वरुन स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटने ड्रॅगन अंतराळयानासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) यशस्वी उड्डाण केले. २८ तासांच्या प्रवासानंतर भारतीय वेळेनुसार २६ जुलै संध्याकाळी ४.३० वाजता हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचेल. तिथे १४ दिवस वास्तव्य करुन संशोधन करतील.
ही मोहीम भारत आणि इस्रोसाठी अंतराळ संशोधनातील एक ऐतिहासिक टप्पा आहे. जागतिक सहकार्याद्वारे अंतराळ संशोधनात नवीन आयाम उघडण्याची अपेक्षा आहे. या अंतराळ मोहिमेमुळे भारताच्या अंतराळ प्रवासात ४१ वर्षांनंतर नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.