इराणच्या आण्विक तळांवरुन ४०० किलो युरेनियम गायब! गेलं कुठे? अमेरिका चिंतेत

25 Jun 2025 19:49:30

वॉशिंग्टन : (Iran) इराण-इस्त्रायल कडून अमेरिकेच्या मध्यस्थीने अखेर युद्धसमाप्तीची घोषणा झाली. परंतु आता यानंतर एक नवा प्रश्न अमेरिकेसह जगाला भेडसावत आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्दो, नतान्झ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले करत समृद्ध युरेनियमचा साठा पूर्णतः नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच आण्विक तळांवरील ४०० किलो युरेनियम इराणने इतरत्र हलवल्याचा दावा केला जात आहे.

युरेनियम गायब झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी दिला दुजोरा 

अमेरिकेने केलेल्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरमध्ये इराणचा अणुबॉम्ब प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला. त्याचवेळी पेटेंगॉन येथील अमेरिकेच्या डिफेन्स इंटलिजन्स एजन्सी म्हणजेच डीआयएने सादर केलेल्या गुप्त अहवालात इराणचे आण्विक तळ उद्ध्वस्त झाले नसून त्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे, हे तळ काही महिन्यांत पुन्हा कार्यरत होतील, असे सांगण्यात आले आहे. पण एकीकडे हा संभ्रम चालू असतानाच या तळांवरून इराणनं हल्ल्याआधीच अणूबॉम्ब बनवण्यासाठी महत्वाचं असलेलं तब्बल ४०० किलो युरेनियम सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहिती समोर आली. या वृत्ताला दुजोरा देत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांनी एका मुलाखतीत इराणमधून ४०० किलोग्रॅम युरेनियम गायब असल्याची माहिती दिली.

४०० किलो युरेनियम गेले कुठे?

या हल्ल्यासाठी अमेरिकेने अत्याधुनिक B-2 स्टेल्थ बॉम्बर्सने ३०,००० पाऊंड वजनाच्या बंकर -बस्टर बॉम्बचा वापर केला होता. परंतु इतक्या विध्वंसक हल्ल्यानंतरही अमेरिकेकडूनच संशय व्यक्त केला जात आहे की, इराणचा युरेनियम साठा सुरक्षित आहे. जर हा दावा खरा असेल तर प्रश्न उरतो की, इराणनं ४०० किलो युरेनियम नेमके कुठे दडवून ठेवले आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील आण्विक तळांवर हल्ला करण्याच्या आधी फोर्दो आण्विक तळाच्या बाहेर एकूण १६ ट्रकची रांग दिसून आली होती. यासंदर्भातले सॅटेलाईट फोटोही व्हायरल झाले होते. पण हल्ल्यांनंतर हे ट्रक अचानक गायब झाल्यामुळे त्यातूनच युरेनियम हलवण्यात आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






Powered By Sangraha 9.0