एमएमआरडीएकडून मेट्रो प्रकल्पांना वेग

Total Views |

मुंबई : मुंबईच्या शहर वाहतूक व्यवस्थेचा कायापालट साध्य करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने मंगळवार,दि.२४ रोजी १२,००० कोटींहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या २८४ व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव (१) असीमकुमार गुप्ता, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी आणि एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग आणि अटल सेतूसह विविध महत्त्वाच्या कामांतील कत्राटांरांच्या नेमणुकीसाठी मंजुरी देण्यात आली. या कंत्राटांत प्रणाली, रोलिंग स्टॉक, नागरी कामे, ट्रॅक्शन पॉवर, एएफसी प्रणाली, डेपो पायाभूत सुविधा आणि मल्टी-मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) यांचा समावेश आहे.

एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, “आज मंजूर झालेले प्रत्येक प्रकल्प हे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या एकात्मिक विकासात मोलाचा वाटा उचलेल याची खात्री करून घेतली आहे. सिस्टम्स इंटिग्रेशन, रोलिंग स्टॉक, ट्रॅक्शन पॉवर, AFC व मल्टी-मोडल इंटिग्रेशन या सर्व घटकांना जोडणारी ही कंत्राटे आम्ही ऑपरेशनल रेडिनेस लक्षात घेऊन मंजूर केली आहेत. शेवटच्या टप्प्याच्या जोडणीवर आमचा भर असून, प्रवाशांसाठी सहज, गतीशील आणि एकात्मिक वाहतूक संरचना निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.”

प्रमुख प्रकल्प व मंजूर कंत्राटांची यादी

प्रकल्प किंमत (कोटींमध्ये)
मेट्रो लाईन ४ आणि ४अ ४,७८८
मेट्रो लाईन ४अ ५५७.५५
मेट्रो लाईन ४ १८८.५९
मेट्रो लाईन ६ ६६८.१५
एमटीएचएल पॅकेज ४ ५५१.४१
मेट्रो लाईन ६ २,२६९.६६
मेट्रो लाईन ६ १०४.६६
मेट्रो लाईन ४ आणि ४अ ५३५.०८
मेट्रो लाईन २अ ४३२.६३
मेट्रो लाईन ९ व ७अ ११८.२८
मेट्रो लाईन ४ आणि ४अ २४९.९७
मेट्रो लाईन २ब ९९.९९
मेट्रो लाईन ५ ४९७.४६
मेट्रो लाईन २ब व ७ ७९.३७
मेट्रो लाईन ९ व ७अ ७०
मेट्रो लाईन ४ आणि ४अ (पॅकेज १) ७७.३८
मेट्रो लाईन ४ आणि ४अ (पॅकेज २)१२९.०४

“महाराष्ट्र शासन केवळ आजच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नव्हे तर भविष्यातील मागण्यांची पूर्वकल्पना घेतलेली पायाभूत सुविधा निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. एमएमआरडीएकडून मंजूर झालेली ही ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक किमतीची गुंतवणूक मुंबईच्या एकात्मिक आणि समावेशक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे आर्थिक गती, शहरी गतिशीलता आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल.”

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

“एमएमआरडीएकडून झालेली ही ऐतिहासिक मंजूरी महाराष्ट्र सरकारच्या जागतिक दर्जाच्या वाहतूक पायाभूत सुविधेच्या बांधणीसाठीच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीद्वारे आम्ही एक समतोल, शाश्वत आणि आधुनिक मेट्रो नेटवर्क घडवत आहोत.”

- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए अध्यक्ष

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.