महानिर्मिती १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

24 Jun 2025 19:37:10


मुंबई : राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प २.०अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. यामुळे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटेल.

जीईपीपी इंडिया हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रकल्प मॉनिटरिंग युनिट सुविधा आणि एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करत आहे. माहितीचे संकलन झाल्याने या प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रकल्पांचे सुलभ व्यवस्थापन शक्य होईल. जीईपीपीच्या तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा उपयोग करून मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० ची प्रभावी अंमलबजावणी करणे.महाराष्ट्रात शाश्वत विकासास चालना देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. हे सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करणे करता धोरणात्मक संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेबाबत मार्गदर्शन करेल.

या समितीमध्ये सर्व सहभागधारक यांचा समावेश असणार आहे. जीईएपीपी इंडिया व महानिर्मितीतर्फे सेंट्रल डॅश बोर्ड तयार करण्यात येणार असून यामार्फत जमीन संपादन ते प्रकल्प उभारणी प्रगती यांचे दैनंदिन तत्वावर अवलोकन करण्यात येणार आहे. सर्व भागधारकांसाठी या डॅश बोर्ड वापराबाबतचे प्रशिक्षण देण्यात येऊन हे सौर प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0