नवी दिल्ली : (Dilip Doshi) भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे सोमवारी २१ जूनला रात्री लंडन येथे वयाच्या ७७व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. दिलीप दोशी हे केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटूच नव्हते, तर त्यांच्या कारकिर्दीनंतर त्यांनी समालोचक म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या स्पष्ट, रसाळ आणि अभ्यासपूर्ण भाष्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये त्यांची क्रेझ होती. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच क्रिकेट जगतातून शोक व्यक्त केला जात आहे.
असामान्य कारकीर्द
१९७९ साली वयाच्या ३२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात पदार्पण करूनही दिलीप यांनी ३३ कसोटी सामन्यांमध्ये ११४ बळी, तर १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २२ बळी घेतले आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वातील एक दिग्गज तारा हरपला आहे. त्यांनी सहा वेळा एका डावात पाच बळी घेतले होते, हे त्यांच्या दर्जेदार गोलंदाजीचे उदाहरण आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिलीप दोशी यांनी एकूण ८९८ बळी घेतले. २३८ सामन्यांमध्ये ४३ वेळा पाच बळी आणि सहा वेळा १० बळी मिळवणे ही त्यांच्या सातत्यपूर्ण प्रभावी कामगिरीची ठळक खूण आहे. भारतासाठी त्यांनी सौराष्ट्र व बंगाल संघांचे प्रतिनिधित्व केले, तर इंग्लंडमध्ये वॉर्विकशायर आणि नॉटिंगहॅमशायर संघांकडून काउंटी क्रिकेटही खेळले.
बीसीसीआय आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून श्रद्धांजली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिलीप दोशी यांचा फोटो एक्सवर शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांच्या निधनाने आम्ही शोकाकुल आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,' अशी पोस्ट बीसीसीआयने केली आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने देखील त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करत म्हटले, "ते आपल्यामागे कौशल्य, वचनबद्धता आणि उत्कृष्टतेचा वारसा सोडून गेले आहेत."
सचिन तेंडुलकर यांची भावनिक पोस्ट
सचिन तेंडुलकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "१९९० मध्ये यूके दौऱ्यावर दिलीपभाईंना भेटलो. त्यांनी मला नेटमध्ये गोलंदाजी केली. ते मला नेहमी प्रेमाने मार्गदर्शन करत आणि मीही त्यांचे आदराने ऐकत असे. त्यांच्यासारख्या प्रेमळ मनाच्या व्यक्तीची कायम आठवण येत राहील,' असे सचिन यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे.