काँग्रेसमध्ये जुने, निष्ठावंत नाराज असंतोष वाढीला; माजी आ. कुणाल पाटील लवकरच भाजपत जाणार

24 Jun 2025 19:01:29

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत. संघटनात्मक गोंधळ, निर्णयक्षमतेचा अभाव आणि संवादाचा तुटलेला धागा, यामुळे नाराज नेते नव्या पर्यायाच्या शोधात आहेत. काँग्रेसचा पारंपरिक गड असलेल्या धुळे जिल्ह्यातूनही असाच सूर उमटत असून, माजी आमदार कुणाल पाटील कुस बदलण्याच्या तयारीत आहेत. ते येत्या २८ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे राजकारण कुणाल पाटील यांच्या भोवती केंद्रित आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांमधील प्रभावामुळे स्थानिक संघटन त्यांच्या भोवती एकवटलेले आहे. अशा स्थितीत जर त्यांनी पक्ष सोडला, तर काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मोठा हादरा बसेल, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे.

कुणाल पाटील यांचे घराणे काँग्रेसमध्ये निष्ठावान मानले जाते. त्यांचे वडील रोहिदास पाटील हे काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. गांधी कुटुंबाशी त्यांचे थेट संबंध होते. राहुल गांधी यांनी धुळे भेटीत त्यांच्या घरी पाहुणचार घेतला होता. मात्र आता त्याच घराण्याचा वारस भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे.

रविंद्र चव्हाणांची भेट खासगी कामासाठी – कुणाल पाटील

विधानसभेतील पराभवापासून कुणाल पाटील हे काँग्रेसवर नाराज आहेत. काही स्थानिक नेत्यांनी या निवडणुकीत विरोधात काम केल्याची त्यांची भावना आहे. अशावेळी त्यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. याविषयी त्यांना विचारले असता, “ती भेट खासगी कामासाठी होती, कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0