कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे 'कुसुम मनोहर लेले' नाटकाने पटकाविले द्वितीय स्थान!

24 Jun 2025 18:24:26



bhandup circle play kusum manohar lele won second place



मुंबई
: महावितरणच्या कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे 'कुसुम मनोहर लेले' या नाटकाने द्वितीय स्थान पटकाविले आहे. तर रत्नागिरी चे नाटक आवर्त; हे नाटक विजेते ठरले आहे. २० जून २०२५ रोजी छत्रपति संभाजी राजे नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. महावितरणचे संचालक (मा सं) श्री. राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, जळगावचे मुख्य अभियंता श्री. इब्राहीम मुलाणी, महाव्यवस्थापक (मा सं) श्री. राजेंद्र पांडे, यांच्यासह कोंकण प्रादेशिक विभागातील विविध परिमंडल कार्यालयातील आलेले अधिकारी, अभियंते, कर्मचारी व नाट्य रसिकांची मांदियाळी यावेळी उपस्थित होती.

मार्गदर्शन करताना संचालक (मा सं) श्री. राजेंद्र पवार म्हणाले, "दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत दर्जेदार नाटकाचे सादरीकरण झाले. २४ तास ग्राहक हिताची बांधिलकी जपतानाच सरावासाठी अगदी कमी कालावधी मिळूनही कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक कलावंतांप्रमाणे सरस अभिनय केला". तसेच त्यांनी दैनंदिन कामातही असाच उत्साह टिकविण्याचे आवाहन त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
भांडुप परिमंडलातर्फे प्रस्तुत नाटक 'कुसुम मनोहर लेले' हे अशोक समेळ लिखित नाटक असून,या नाटकामध्ये कुसुम व मनोहर लेले या दाम्पत्यास मुल नसल्याने, मनोहर हा सुजाता नावाच्या घटस्फोटित मुलीशी बाळ मिळवण्यासाठी लग्नाचे खोटे नाटक करतो व त्यानंतर बाळाला मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही बाळ न मिळाल्याने सुजाता संभ्रमित अवस्थेत जाते. तेव्हा तिचा पहिला नवरा सदानंद देशमुख हा तीच बाळ लेले कडून त्याच्या अनोख्या पद्धतीने परत मिळवून आणतो अशी ही एक कहाणी असून भांडूप परिमंडलाच्या कलाकाराने सुंदररित्या प्रस्तुती करून अनेक बक्षिसे मिळविली आहे. विशेष म्हणजे या नाटकामध्ये सुजाताचा अभिनय साकारणाऱ्या रुपाली पाटील यांना त्यांच्या अभिनयासाठी प्रथम पारितोषिकाने सन्मानित केले आहे.



सदर नात्याप्रयोगाचा सराव व सादरीकरण करण्यासाठी भांडुप परिमंडलातील उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, श्री. महेंद्र बागुल यांनी विशेष मेहनत घेतली. भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता व निर्माते श्री. संजय पाटील यांनी नाटकाशी संबंधित सगळ्यांचे कौतुक केले. भांडुप परिमंडळाला मिळालेली बक्षिसे: अभिनय स्त्री प्रथम- सौ. रूपाली पाटील, नाट्य निर्मिती- द्वितीय , दिग्दर्शक द्वितीय- श्री. चंद्रमणी मेश्राम, रंगभूषा व वेशभूषा- द्वितीय, अभिनय पुरुष द्वितीय- देवव्रत पवार, उत्तेजनार्थ अभिनय पुरुष- चंद्रमणी मेश्राम, प्रकाश योजना – द्वितीय.




Powered By Sangraha 9.0