नवी दिल्ली(Ahmedabad plane crash): एअर इंडियाच्या सर्व बोईंग विमानांचे संपूर्ण सूरक्षा ऑडिट होईपर्यंत सर्व विमानांची विमानसेवा रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात वकील अजय बन्सल यांनी दाखल केली आहे. देशातील विमान सेवेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत ही याचिका दाखल करण्यात आली असून यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अहमदाबादहून लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग एआय १७१ विमानाचा दि. १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ अपघात झाला होता. यात सुमारे २७४ नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर देशात एअर इंडिया किंवा इतर विमान सेवेच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सुरक्षेच्या बाबतीत, मंगळवार, दि. २४ जून रोजी एअर इंडियाने चालवलेल्या सर्व बोईंग विमानांचे सुरक्षा ऑडीट पूर्ण होईपर्यंत, त्यांची विमान सेवा निलंबित करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या याचिकेत याचिकाकर्ते वकिल अजय बन्सल यांनी सर्वोच्च न्यायालयात एअर इंडियाच्या उड्डाणा संदर्भात प्रवाशांची सुरक्षा आणि त्याबाबतीत कायदेशीर पालन करण्याची विनंती केली आहे. याचिकेत पुढे अजय बन्सल म्हणाले, “ एअर इंडियाच्या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडांवर प्रकाश टाकणारे अनेक अहवाल आणि व्हिडिओ आहेत. १२ जून रोजी झालेल्या अपघातामुळे विमानाच्या हवाई क्षमतेबद्दल आणि देखभाल तपासणीच्या पर्याप्ततेबद्दल गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.”
या याचिकेनुसार, नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए)च्या तपासणी अहवालात एअर इंडियाने बऱ्याच वेळेस सुरक्षा ऑडिट अंतर्गत खोट्या नोंदी दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचिकेत १९३४ च्या विमान कायद्याची आणि १९३७ च्या विमान नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची आणि केबिन सिस्टम, एअरफ्रेम आणि इंजिनची अनिवार्य नियतकालिक तपासणी करण्याची विनंती केली आहे.
अजय बन्सल यांनी सुरक्षेबाबतच्या बाबी सार्वजनिकरीत्या जाहीर करण्याची आणि पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाला देण्याची विनंती केली आहे. यावर लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.