पहलगाम हल्ला – महत्त्वाचे पुरावे एनआयएच्या हाती

24 Jun 2025 15:53:57
 
Pahalgam attack Important evidence NIA
 
 
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या ओळखीबाबत पुरावे गोळा केले आहेत, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 
जमवण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये पीडितांचे प्रत्यक्षदर्शींचे कथन, व्हिडिओ फुटेज, तांत्रिक पुरावे आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जारी केलेले रेखाचित्र यांचा समावेश आहे. सर्व पुरावे काळजीपूर्वक विश्लेषित केले जात आहेत आणि अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. ओळख आणि अधिक तपशील योग्य वेळी सार्वजनिक केले जातील. २३ जून रोजी, जम्मूच्या न्यायालयाने एनआयएला हल्ल्याशी संबंधित दोन्ही आरोपींना पाच दिवसांची कोठडी दिली होती. दोघांची ओळख परवेझ अहमद आणि बशीर अहमद अशी झाली आहे. शिवाय, पुढील सुनावणीची तारीख २७ जून २०२५ निश्चित केली आहे.
 
एनआयएने म्हटले आहे की, पहलगाममधील बटकोट येथील परवेझ अहमद जोथर आणि पहलगाममधील हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर या अटक केलेल्या दोन आरोपींनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे आणि ते लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी देखील केली आहे. एनआयएने त्यांच्या तपासाचा हवाला देत म्हटले आहे की, परवेझ आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी जाणूनबुजून तीन सशस्त्र दहशतवाद्यांना हिल पार्क येथील हंगामी ढोक (झोपडी) येथे आश्रय दिला होता. या दोघांनी दहशतवाद्यांना अन्न, निवारा आणि अन्य मदत पुरवली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0