नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला मिळालेल्या यशामुळे जगासमोर दहशतवादाविरुद्ध भारताचे ठाम धोरण प्रतिबिंबित झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले आहे.
नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, अलीकडेच जगाने भारताची क्षमता पाहिली. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरुद्ध भारताचे ठाम धोरण जगासमोर स्पष्ट केले. भारतीयांचे रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्यांसाठी कोणतीही जागा सुरक्षित नाही हे आम्ही दाखवून दिले आहे. आजचा भारत देशाच्या हितासाठी जे करता येईल आणि जे योग्य आहे त्यानुसार पावले उचलतो. संरक्षण गरजांसाठी, भारताचे परदेशांवरील अवलंबित्व सतत कमी होत असल्याचे स्पष्ट झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
संरक्षण क्षेत्रात देश स्वावलंबी होत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, मेड इन इंडिया शस्त्रे लवकरच जगभरात प्रसिद्ध होतील. भारत संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भर' होत आहोत. ऑपरेशन सिंदूर दरम्यानही आपण त्याचा परिणाम पाहिला आहे. मेड इन इंडिया शस्त्रांच्या मदतीने आपल्या सैन्याने २२ मिनिटांत शत्रूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले. येणाऱ्या काळात मेड इन इंडिया शस्त्रे जगभरात वर्चस्व गाजवतील, असाही विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला आहे.