मुंबई : गेल्या दशकभरात देशात खादी ग्रामोद्योगाचा सर्वांगीण विकास झाला असून, खादी ग्रमोद्योगाने तब्बल 347 टक्के प्रगती केल्याची माहिती सरकारने दिली आहे. 2024-25 या काळात खादी ग्रामोद्योगाने 1 लाख, 16 हजार, 599 कोटी रुपये मूल्याचे उत्पादन नोंदवले आहे. तुलनेने 2013-14 मध्ये खादी ग्रामोद्योगाचे उत्पादन 26 हजार, 109 कोटी इतके होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारला नुकतीच 11 वर्षे पूर्ण झाली असून, गेल्या दशकभरातील कामांचा लेखाजोखा सरकारने जनतेसमोर सादर केला आहे. मोदी सरकारच्या आजवरच्या कारकिर्दीत खादी ग्रामोद्योग क्षेत्राची भरभराट झाली. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, खादी ग्रामोद्योगाच्या उत्पादनात 347 टक्के वाढ झाली असून 2024-25 मध्ये 1 लाख, 16 हजार, 599 कोटी रुपयांचे उत्पादन या क्षेत्रात झाले. तसेच, उत्पादनवाढीबरोबरच विक्रीमध्येही वृद्धी साधण्यात मोदी सरकारला यश आले आहे. गेल्या 11 वर्षांत खादी ग्रामोद्योगाच्या उत्पादनांना मोठी मागणी असून या क्षेत्राची विक्री 447 टक्के झाली आहे. खादी ग्रामोद्योगाने रोजगाराच्या क्षेत्रातदेखील भरघोस कामगिरी करताना, 49.23 टक्के इतके योगदान दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या खादीकडे स्वातंत्र्यानंतर दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे खादीच्या विकासाची गती मंदावली. मात्र, गेल्या 11 वर्षांत खादीला देशाचा ‘ब्रॅ्रण्ड’ म्हणून विकसित करण्यात मोदी सरकारला यश आलेले दिसते.
आज जवळपास गृहोपयोगी आणि जीवनावश्यक वस्तू, सौंदर्यप्रसाधने, वस्त्रे आणि कापड अशा अनेकविध वस्तूंची विक्री खादी ग्रामोद्योगमार्फत केली जाते. गायींच्या शेणापासून रंगनिर्मिती करून बाजारामध्ये विक्रीला आणण्यातही खादी ग्रामोद्योगाला यश आले आहे. ग्रामोत्पादन आणि खादीच्या शक्तीला एकत्र आणल्याने विकासाची गती वाढली असून रोजगारनिर्मिती देशाच्या कानाकोपर्यात झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आमूलाग्र योगदान देणार्या खादीला मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात खर्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत.