धर्मनिरपेक्ष लोक फक्त हिंदूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात : पवन कल्याण

23 Jun 2025 13:19:57

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
'धर्मनिरपेक्ष लोक फक्त हिंदूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात', असे परखड मत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मांडले. तामिळनाडूच्या मदुराई शहरात भगवान मुरुगन यांच्या नावाने एक भव्य परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत हजारो लोक उपस्थित होते आणि व्यासपीठावर बसलेले नेते हिंदू एकता आणि संस्कृतीच्या रक्षणाबद्दल बोलताना दिसले.

पवन कल्याण म्हणाले की, आजकाल स्वतःला 'धर्मनिरपेक्ष' म्हणवणारे फक्त हिंदू धर्मावर प्रश्न उपस्थित करतात. इतर धर्मांच्या वाईट गोष्टींबद्दल कोणीही काहीही बोलत नाही. नास्तिकांना आता हिंदू देवतांचा अपमान करणे ही एक सवय झाली आहे, जणू तो त्यांच्यासाठी विनोद आहे. जर हे थांबले नाही तर हिंदू धर्म वाचवणे कठीण होईल. पवन कल्याण यांनी तामिळनाडूचे प्रसिद्ध नेते मुथुरामलिंग थेवर यांना भगवान मुरुगनचे अवतार म्हणून वर्णन केले आणि ते जगातील पहिले क्रांतिकारक असल्याचे सांगितले.

एकामागून एक, परिषदेतील नेत्यांनी सांगितले की, हिंदू समाजाने एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. तामिळनाडू सरकार मंदिरांना पैसे कमविण्याचे साधन बनवत आहे, तर मंदिरांचे पैसे भाविकांच्या सेवेसाठी वापरायला हवेत. ही परिषद मात्र विरोधकांच्या डोळ्यांना चांगलीच खुपली, ज्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. द्रमुक सरकारने या परिषदेवर टीका केली. राज्याचे धार्मिक व्यवहार मंत्री पी के शेखरबाबू म्हणाले की, भगवान मुरुगन राजकारण ओळखतात आणि ते कधीही चुकीच्या लोकांना आशीर्वाद देणार नाहीत. त्यामुळे धर्माला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे.


Powered By Sangraha 9.0