'मरिन लाईफ आॅफ मुंबई' या मोहिमेअंतर्गत एप्रिल महिन्यात सागरी जीवांचे निरीक्षक प्रदीप पाताडे हे काही मंडळींना घेऊन कार्टर रोडवरील खडकाळ किनाऱ्यावर गेले होते. यावेळी लिजू थॉमस यांना खडकाळ किनाऱ्यावरील एका डोहात इंडियन लायनफिश हा मासा दिसला. त्यांनी लागलीच या माशाचे छायाचित्र टिपले. त्यानंतर यासंबंधीची नोंद 'आय-नॅचरललिस्ट' या संकेतस्थळावर केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी 'आय-नॅचरललिस्ट'कडून ही नोंद शास्त्रीय नोंद म्हणून स्वीकारण्यात आली. त्यामुळे मुंबईतून या माशाची ही पहिलीच शास्त्रीय नोंद म्हणून स्वीकारण्यात आली आहे.
लायनफिश हे विषारी काटे असलेले मासे आहेत, जे 'स्कोर्पिनिडी' (Scorpaenidae) कुटुंबातील आहेत. या माशांचे शरीर लांबट असते, आणि त्यांच्या पाठीवर आणि बाजूला विषारी काटे असतात. या विषाचा परिणाम माणसांवर फारसा होत नाही. मात्र, काट्यांमध्ये असलेल्या विषामुळे वेदना आणि सूज येऊ शकते. त्यांचे पंख मोठे आणि आकर्षक असतात, ज्यामुळे त्यांना ओळखणे सोपे होते. पखांच्या या रचनेमुळेच त्यांना शोभिवंता मत्स्यपालनामध्ये मोठी मागणी असते. लायनफिश लहान मासे आणि क्रस्टेशियन्स खातात. ते हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर तसेच कॅरिबियन समुद्रात देखील आढळतात. हा मासा परभक्षी असल्याने परिसंस्थेतील माशांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.