मुंबई : उबाठा गटाचे चांदिवली विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे. रविवार, २२ जून रोजी मंत्री आशिष शेलार आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
उबाठा गटाचे चांदिवली विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका, प्रभाग समितीच्या अध्यक्षा आकांक्षा शेट्ये यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "ईश्वर तायडे आणि आकांक्षा शेट्ये यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्विकारून उद्धवजींच्या नेतृत्वाला बाजूला सारले आहे. आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने मूळ शिवसेना उबाठा गटाचा मुंबई महापालिकेतील आकडा पार करून आम्ही मुंबईतील क्रमांक एकचा पक्ष झालो आहोत," असे त्यांनी सांगितले.