मुंबई : ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये, असा हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. मनसे-उबाठा यूतीच्या चर्चांवरून त्यांनी नाव न घेता संजय राऊतांनाच हा टोला लगावल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यभरात सध्या उबाठा गट आणि मनसेच्या यूतीच्या चर्चा सुरु आहे. त्यातही संजय राऊत दररोद पत्रकार परिषदेतून या यूतीबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे सांगून यूतीचे संकेत देतात. मात्र, मनसेकडून याबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही.
यावरूनच संदीप देशपांडे यांनी उबाठा गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, " ट्रम्प पासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्हाला सल्ले देतात की, प्रश्न विचारू नका. मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये. जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा," अशा शब्दात त्यांनी नाव न घेता संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला.