मुंबई : शिवसेनेच्या आणि राज्याच्या मनात आहे तेच होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांच्या आणि राज्याच्या मनातलं कळतं का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. रविवार, २२ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संदीप देशपांडे म्हणाले की, "शिवसेनेच्या आणि राज्याच्या मनात आहे तेच होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण मुळात उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांच्या आणि राज्याच्या मनातलं कळतं का, यावरच माझा विश्वास नाही. जर त्यांना कळत असतं तर ज्यावेळी महाबळेश्वरचे अधिवेशन झाले त्यावेळी राज ठाकरे हेच कार्याध्यक्ष व्हावे, हे शिवसैनिकांच्या मनात होते. पण ते झाले नाहीत. २०१४ ला विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेचे ६३ आमदार निवडून दिलेत. पण लोकांच्या मनातील न ओळखता उद्धव ठाकरे पुन्हा भाजपच्या मांडीवर जाऊन बसले."
"त्यानंतर २०१९ च्या निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेने सत्ता स्थापन करावी, यासाठी लोकांनी जनादेश दिला. पण ते न ऐकता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. २०२२ ला स्वत:चे ३०-४० वर्षे सहकारी असणाऱ्या आमदारांच्या मनात काय चाललं हे ज्या पक्षप्रमुखाला कळत नाही त्यांना जनतेच्या मनातलं कसं कळतं हा प्रश्न आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आतापर्यंत शिवसेना आणि मनसेची यूती करायची आहे, असे एकदाही उद्धव ठाकरे म्हणाले नाही. त्यामुळे त्यावर कुणी काही बोलण्याचा विषयच येत नाही. आजूबाजूचे चमचेच रोज सकारात्मक असल्याचा ढिंढोरा पिटतात. पक्षप्रमुखांची इच्छा आहे की, नाही हे आम्हाला अजून समजलेले नाही. त्यामुळे त्यावर बोलण्याचा विषयच नाही."
रस्त्यावर उतरून हिंदी सक्तीविरोधात आंदोलन!
"येत्या सोमवारपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक रस्त्यावर उतरून हिंदी सक्तीविरोधातील लढाई लढणार आहोत. आम्ही उद्यापासून पालकांच्या सह्यांची मोहिम सुरु करणार असून त्यापुढचे आंदोलन कसे असेल हे दिसेलच," असेही ते म्हणाले.